मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kasba Peth Bypoll : कसबा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; भाजपविरोधात हिंदू महासभेचा उमेदवार रिंगणात

Kasba Peth Bypoll : कसबा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; भाजपविरोधात हिंदू महासभेचा उमेदवार रिंगणात

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 06, 2023 12:38 PM IST

Kasba Peth Bypoll : कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि काँग्रेसनं उमेदवार जाहीर केलेले आहे. त्यानंतर आता हिंदू महासभेनंही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Hindu Mahasabha Contest In Kasba Peth Pune Bypoll
Hindu Mahasabha Contest In Kasba Peth Pune Bypoll (HT)

Hindu Mahasabha Contest In Kasba Peth Pune Bypoll : पुण्यातील कसबा पेठ विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपनं पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं भाजप नेते शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांनी नाराजी व्यक्त करत दिवंगत भाजप नेत्या मुक्ता टिळक यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. याशिवाय हेमंत रासने यांच्या उमेदवारीला मतदारसंघातून मोठा विरोध होत असतानाच आता हिंदू महासभेनं कसब्यातील पोटनिवडणुकीत उडी घेत निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं आता ऐन पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीबाबत हिंदू महासभेनं एक निवेदन जारी करत निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहचवणे आणि पुण्येश्वराला मुक्त करत स्वच्छ आणि सुरक्षित पुणे निर्माण करण्यासाठी आम्ही निवडणूक लढणार असल्याचं हिंदू महासभेनं निवेदनात म्हटलं आहे. शिवप्रभू, संभाजी राजे, श्रद्धेय वीर सावरकर, हेडगेवार गुरुजी आणि गोळवळकर गुरुजी यांना स्मरून आणि स्वर्गीय मुक्ताताईंचा आशीर्वाद घेऊन महासभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं निवेदनात सांगण्यात आलं आहे. उद्या मंगळवारी दुपारी हिंदू महासभेचा उमेदवार पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहे. भाजपानं कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळं टिळक कुटुंबियांसह हिंदुत्ववादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सकाळी टिळक कुटुंबियांची भेट घेत चर्चा केली आहे. त्यामुळं आता कसब्यातील पोटनिवडणूक भाजपसाठी चांगलीच कसोटी ठरण्याची चिन्हं आहेत.

पुण्यातील त्या बॅनर्सची राज्यभरात चर्चा....

भाजपनं टिळक कुटुंबियांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळं अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुलकर्णी आणि टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा का?, अशा आशयाचे पोस्टर्स कसबा मतदारसंघातील अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. ब्राह्मण महासंघानंही भाजपच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली केली आहे. त्यामुळं आता कसब्यात भाजपच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

IPL_Entry_Point