मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Employee Strike : ठाण्यानंतर या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची संपातून माघार; मनपातील कामकाज सुरळीत सुरू

Employee Strike : ठाण्यानंतर या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची संपातून माघार; मनपातील कामकाज सुरळीत सुरू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 15, 2023 04:38 PM IST

Employee Strike For Old Pension Scheme : ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना निवेदन देत संताप सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता आणखी एका जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी संप नाकारला आहे.

Employee Strike For Old Pension Scheme In Maharashtra
Employee Strike For Old Pension Scheme In Maharashtra (HT)

Employee Strike For Old Pension Scheme In Maharashtra : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळं राज्यातील प्रमुख शहरांमध्ये प्रशासकीय यंत्रणा खोळंबल्यानं त्याचा सामान्यांना मोठा फटका बसला आहे. परंतु आता कर्मचारी संप सुरू होऊन केवळ एक दिवसाचा कालावधी उलटलेला असतानाच ठाण्यासह सोलापुरातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं कर्मचारी संघटनांच्या एकीला राज्यात दुसरा मोठा धक्का बसला आहे. सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी संपावर न जाता केवळ काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं राज्यातील अनेक शहरांमध्ये शासकीय कार्यालयं ओस पडलेली असताना सोलापूर मनपात मात्र कामकाज सुरळीतपणे सुरू होतं.

मंगळवारी सोलापूर महापालिकेतील ५४२१ कर्मचाऱ्यांपैकी ३४६५ कर्मचारी संपावर गेले होते. त्याचा परिमाम पालिकेतील कामकाजावर झाला होता. त्यानंतर आज मात्र बहुतांश कर्मचारी कामावर परतले आहेत. कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करण्यास सुरुवात केली असून संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आज सकाळपासून सोलापूर मनपातील कारभार सुरळीतपणे सुरू होता. त्यामुळं आता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये कर्मचारी अद्यापही संपावर असतानाच सोलापुरातील कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली आहे.

राज्य कर्मचारी संपावर गेल्यामुळं सामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारी कार्यालयं ओस पडल्यामुळं प्रशासकीय कामकाज खोळंबलेलं आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णालयातील कर्मचारी देखील संपात सहभागी झाल्यामुळं त्याचा मोठा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकारनं तातडीनं कर्मचारी संघटनांशी चर्चा करून जुन्या पेन्शन योजनेबाबत तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.

IPL_Entry_Point