मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : तुम्ही कोंडी केली अन् आम्ही मुसंडी मारली; फडणवीसांची आठवले स्टाईलमध्ये टोलेबाजी

Devendra Fadnavis : तुम्ही कोंडी केली अन् आम्ही मुसंडी मारली; फडणवीसांची आठवले स्टाईलमध्ये टोलेबाजी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 15, 2023 03:52 PM IST

Devendra Fadnavis Speech : अजित पवारांनी बंडाचा विषय काढला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवलेंच्या स्टाईलमध्ये टोलेबाजी केल्यामुळं सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.

devendra fadnavis in vidhan sabha
devendra fadnavis in vidhan sabha (HT)

Devendra Fadnavis Speech In Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या स्टाईलमध्ये विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली आहे. आमदारांच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मंत्री सभागृहात हजरच राहत नसल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या बंडाचा विषय अजित पवारांनी काढला आणि त्यानंतर संतापलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी चक्क आठवले स्टाईलने शिंदे गटाचा जोरदार बचाव केला. त्यामुळं सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधी आमदारांना हसू आवरेनासं झालं होतं.

नेमकं काय झालं?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर पवारांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, तुम्हाला रामदास आठवले यांच्या भाषेत सांगायचं झालं तर 'तुम्ही एकनाथ शिंदेंची कोंडी केली म्हणूनच आम्ही मुसंडी मारली.' त्यावेळी आमदारांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. यावेळी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारही जोरात हसायला लागले. ऐरवी अभ्यासू भाषणानं विरोधकांना घायाळ करणाऱ्या फडणवीसांनी चक्क आठवले स्टाईलनं विरोधकांना प्रत्युत्तर दिल्यामुळं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

अजित पवारांचा संताप अन् फडणवीसांची दिलगिरी...

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आज सभागृहात तब्बल सात मंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर सभागृहात घडलेल्या या प्रकाराबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली. रात्री सभागृह उशिरापर्यंत चालल्यामुळं मंत्र्यांना ब्रिफिंगसाठी वेळच मिळालेला नाही. त्यात आता सुधारणा करण्यात येईल. सरकारमधील सर्व मंत्र्यांना सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश देत आहोत, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विषय संपवला.

IPL_Entry_Point