मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Supreme Court: राज्यपालांच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे; सरन्यायाधीशांनी शिंदे गटालाही झापलं!

Supreme Court: राज्यपालांच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे; सरन्यायाधीशांनी शिंदे गटालाही झापलं!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 15, 2023 02:58 PM IST

Maharashtra Political Crisis : शिंदे गटाच्या आमदारांना जीवाची भीती होती तर त्यांनी सुरक्षेसाठी पत्र लिहिणं गरजेचं होतं. अशा घटनांमुळं महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याला कलंक लागल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे.

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis (HT)

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षांची सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच आता सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सत्तांतरातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोर्टानं राज्यपालांच्या भूमिकेवर कठोर शब्दात ताशेरे ओढत शिंदे गटालाही सुनावलं आहे. त्यामुळं आता राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेमुळंच महाविकास आघाडी सरकार कोसळलं, अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या वकिलांना सुनावलं आहे.

सुप्रीम कोर्टात वकील तुषार मेहता यांनी राज्यपालांच्या वतीनं युक्तिवाद केल्यानंतर बोलताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, महाराष्ट्र हे राजकीयदृष्ट्या अत्यंत सुसंस्कृत असं राज्य आहे. अशा प्रकारच्या घटना निराशाजनक असून त्यामुळं राज्याच्या प्रतिष्ठेला कलंक लागला आहे. तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीचे आदेश देणं हा मविआ सरकार पाडण्याचं पहिलं पाऊल होतं. सरकार पडेल अशी कोणतीही कृती राज्यपालांनी करायला नको होती. विरोधी पक्षनेत्यांनी राज्यपालांना पत्र देणं ही काही नवीन बाब नसल्याचं सांगत सरन्यायाधीशांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

शिंदे गटाच्या आमदारांच्या जीवाला धोका होता म्हणून बहुमत चाचणीची काय गरज होती. त्यांनी सुरक्षेसाठी राज्यपालांना पत्र लिहिलं असतं, तरी प्रश्न सुटला असता. त्यानंतर अधिवेशन नसतानाही राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश कसे काय दिले?, असं म्हणत सुप्रीम कोर्टानं राज्यपालांसह शिंदे गटालाही झापलं आहे. शिवसेनेच्या ३४ आमदारांनी गटनेत्याची निवड केली, हा मुद्दा योग्य वाटतो. परंतु राज्यपालांनी सरकार पाडण्यासाठी केलेलं कृत्य लोकशाहीसाठी घातक असल्याचंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला- सरन्यायाधीश

एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकारमध्ये सहभागी होते. त्यामुळं तीन वर्ष सुखी संसार एकाच रात्रीत कसा काय मोडला?, असा सवाल सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला केला आहे. तीन वर्षात शिंदे गटानं एकही पत्र लिहिलं नाही आणि त्यानंतर एकाच आठवड्यात सहा पत्र कशी काय लिहिण्यात आली?, असा सवाल करत सरन्यायाधीशांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले आहेत.

IPL_Entry_Point