मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : गुवाहाटीला पुन्हा जाण्याचं कारण काय?, मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट शब्दांत थेट उत्तर

Eknath Shinde : गुवाहाटीला पुन्हा जाण्याचं कारण काय?, मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट शब्दांत थेट उत्तर

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 26, 2022 10:54 AM IST

Eknath Shinde In Guwahati : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज समर्थक आमदारांसह आसामची राजधानी गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी शिंदे गटाचे सर्व आमदार मुंबईत दाखल झाले आहे.

Maharashtra CM Eknath Shinde
Maharashtra CM Eknath Shinde (PTI)

CM Eknath Shinde Guwahati Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिंदे गटाच्या आमदारांसह आसामची राजधानी गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी राज्यातील शिंदे गटाचे नेते मुंबई विमानतळावर दाखल झाले असून थोड्याच वेळात एअर इंडियाच्या दोन विशेष विमानांनी सर्व नेते गुवाहाटीत दाखल होणार आहेत. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाध साधत गुवाहाटी दौऱ्याचं कारण आणि महत्त्व सांगितलं आहे. राज्यात जनतेच्या मनातलं सरकार स्थापन झालं असून आम्ही जनतेसाठी काम करत आहोत, आमचा कोणताही अजेंडा नसल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

माध्यमांसोबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या आशिर्वादामुळं महाराष्ट्रात सत्तांतर झालं आहे. या देवीवर आमची श्रद्धा असल्यानं आम्ही तिच्या दर्शनासाठी जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी आसाममध्ये येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळं आम्ही राज्यातील जनतेच्या सुख आणि समृद्धीसाठीही कामाख्या देवीकडे प्रार्थना करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदार गुवाहाटीला जाणार असल्याची चर्चा सुरू होती. सुरुवातीला या दौऱ्यासाठी २१ नोव्हेंबरची तारीख फिक्स करण्यात आली होती. परंतु नेत्यांच्या सोयीनुसार तारखेत बदल करून २६ नोव्हेंबरला दौरा आखण्यात आला. दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्याला शिंदे गटाच्याच चार मंत्र्यांनी दांडी मारली आहे. मंत्री गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई आणि तानाजी सावंत हे चार मंत्री नियोजित कार्यक्रमामुळं महाराष्ट्रातच असल्याची माहिती आहे. यामुळं शिंदे गटात काहीही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.

IPL_Entry_Point