मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Food Poisoning : राज्यातील अनेक भागांमध्ये भगरीतून विषबाधा; नवरात्रोत्सवात धक्कादायक प्रकारांनी खळबळ

Food Poisoning : राज्यातील अनेक भागांमध्ये भगरीतून विषबाधा; नवरात्रोत्सवात धक्कादायक प्रकारांनी खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 28, 2022 11:38 AM IST

Food Poisoning : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भगरीतून विषबाधा झाल्याचे प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळं आता या प्रकरणात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Food Poisoning Cases In Maharashtra
Food Poisoning Cases In Maharashtra (HT)

Food Poisoning Cases In Maharashtra : सध्या राज्यात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. परंतु या उत्सवानिमित्त भगर किंवा भगरीचं पिठ खाल्ल्यानं राज्यातील अनेक भागांमध्ये विषबाधा झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळं खळबळ उडाली असून या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील लासूरमध्ये आणि जालन्यातील परतूरमध्ये एकूण ३४ लोकांना भगर खाल्ल्यानं विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यात भगरीच्या खरेदीबाबत आणि त्याच्या सेवनाबाबत प्रशासनानं नियमावली जारी केली होती. परंतु या घटनानंतर बीड जिल्ह्यात २०० लोकांना भगरीतून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या सर्व बाधितांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

प्रकरण आता एका जिल्ह्यापूरतंच मर्यादित नाहीये...

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद आणि जालन्यात किमान ५५० लोकांना भगरीतून विषबाधा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता बीड जिल्ह्यात २०० लोकांना बिषबाधा झाल्याची माहिती समोर येत असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातल्या करंजी गावातही अनेक लोकांना विषबाधा झाल्याची प्रकार समोर आला आहे. त्यामुळं आता बाधितांवर तिसगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्रशासनाची दुकानांवर मोठी कारवाई...

चार ते पाच जिल्ह्यांमध्ये भगरीतून विषबाधा होत असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासन विभागानं औरंगाबादेतील मोंढा नाका परिसरातील दोन दुकांनावर छापेमारी केली आहे. या कारवाईत विषयुक्त भगर सापडली असून या दुकानांना सील करण्यात आलं आहे. याशिवाय जिल्ह्यात भगर विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

IPL_Entry_Point