मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Begusarai Bridge Collapse : उद्घाटनाआधीच कोसळला पूल, एका क्षणात १३ कोटी पाण्यात

Begusarai Bridge Collapse : उद्घाटनाआधीच कोसळला पूल, एका क्षणात १३ कोटी पाण्यात

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 20, 2022 09:29 AM IST

Begusarai Bihar Bridge Collapse : पुलाला बांधण्यासाठी सरकारनं तब्बल १४ कोटी रुपये खर्च केले होते. परंतु पुलाला तडे जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. परंतु त्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानंच हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Begusarai Bihar Bridge Collapse
Begusarai Bihar Bridge Collapse (HT)

Begusarai Bihar Bridge Collapse : गुजरातच्या मोरबीत झुलता पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता बिहारमध्ये पूल कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं राज्यात खळबळ उडाली असून यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. काही दिवसांपूर्वीच पुलाचं काम पूर्ण झालं होतं. त्याचं उद्घाटनाचीही प्रशासनाकडून तयारी सुरू होती. परंतु त्याआधीच पूल कोसळल्यानं या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याशिवाय पूल दुर्घटनेमुळं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही टीका केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील गंडक नदीवरून वाहतूक करण्यासाठी २०१६ साली पूल मंजुर करण्यात आला होता. त्यासाठी सरकारनं १३ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला होता. त्यानुसार पुलाचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं होतं. पूल उद्घाटनासाठी तयार असतानाच तो नदीपात्रात कोसळला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती समजताच बेगूसरायच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची माहिती घेतली. याशिवाय पूल कोणत्या कारणांनी कोसळला, याचीही चौकशी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पूल कोसळल्यानं विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदारांसह २० हजार लोकांचा शहराशी संपर्क तुटला आहे.

तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानंच घडली दुर्घटना...

नॅशनल बॅंक आणि नाबार्डच्या मदतीनं या पुलाचं बांधकाम करण्यात आलं होतं. परंतु पुलाच्या अनेक भागाला गेल्या काही दिवसांपासून तडे जात होते. ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी प्रशासनाकडे तक्रारही केली होती. परंतु त्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळं आता स्थानिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यानं प्रशासनाचा हलगर्जीपणाच या दुर्घटनेसाठी जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर या पूल दुर्घटनेत दोषी असलेल्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग