Uddhav Thackeray Aurangabad Visit : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसानं जोर धरलेला आहे. त्यामुळं सोयाबीन, कापूस, मका आणि इतर अनेक पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं ऐन दिवाळीत शेतकऱ्यावर मोठं संकट ओढवलेलं आहे. त्यामुळंच आता मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत.
सत्तांतरानंतर पहिलाच मराठवाडा दौरा...
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या बंडात औरंगाबादेतील सहापैकी पाच आमदारांचा समावेश होता. त्यानंतर आता मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यामुळं आता ते नुकसानग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
कसा आहे उद्धव ठाकरेंचा दौरा...
१. दुपारी १२.१५ वाजता औरंगाबाद विमानतळाहुन दहेगाव ता. गंगापुर कडे प्रयाण.
२. दुपारी १ वाजता दहेगाव ता. गंगापुर येथे आगमन व दहेगाव शिवार येथे पीक नुकसानीची पाहणी.
३. दुपारी १.१५ वाजता पेंढापूर ता. गंगापुरकडे प्रयाण.
४. दुपारी १.३० वाजता पेंढापूर ता. गंगापुर येथे आगमन नुकसानग्रस्त भागांची पाहणी.
५. दुपारी १.४५ वाजता पत्रकारांशी संवाद
६. दुपारी २.४५ वाजता चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद प्रयाण.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी...
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं या भागांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांसह विरोधी पक्षांकडून केली जात आहे. परंतु राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना याबाबत माध्यमांनी विचारलं असता त्यांनी 'ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नसल्याचं' म्हटलं होतं. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.