मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पालकासारखं बोला, महाराष्ट्राला पालकाची भाजी समजू नका; ठाकरेंचा मोदींवर प्रहार

पालकासारखं बोला, महाराष्ट्राला पालकाची भाजी समजू नका; ठाकरेंचा मोदींवर प्रहार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 10, 2022 02:34 PM IST

Uddhav Thackeray On Samriddhi Highway Inauguration : मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपस्थितांशी बोलताना ठाकरेंनी मोदी आणि भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray vs Narendra Modi On Samriddhi Highway Inauguration : 'समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यांवर पांघरून घालण्याचं प्रयत्न ते करतील. महाराजांचा जयजयकार करतील. बाळासाहेब कसे होते, हे सांगत आमच्यावर टोमणेबाजी करतील. त्यांनी जरूर बोलावं, देशाच्या पालकासारखं बोलावं. महाराष्ट्राला पालकाची भाजी समजून बोलू नये, कुणीही येऊन आमची भाजी करायला आम्ही मिंधे नाही, असा सूचक इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगीत मराठवाडा साहित्य संमेलनाचं उदघाटन माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपस्थितांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, लोकांनी निवडून दिलेल्या मतांची किंमत खोक्यांमध्ये मोजता येत नाही. देशात गुप्त मतदानपद्धती असल्यानं ही मतं कुणाकडून आणि कुठे जाणार आहे, हे माहिती आहे का?, खोक्यांचंच राजकारण होणार असेल तर लोकशाही संपली असं जाहीर करून टाकायला हवं, असं म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजप नेते आणि उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, शिक्षण देण्यासाठी जर भीक मागायची असेल तर शिकल्यावर देखील भीक मागायला लावायची तुमची इच्छा आहे का?, संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम हे कोणत्या शाळेत शिकले होते?, चंद्रकांत पाटील कोण आम्हाला शिकवणारे?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

IPL_Entry_Point