मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मंत्रालयात सरकार जात असल्यासारखी लगबग; बड्या नेत्याच्या विधानानं खळबळ

मंत्रालयात सरकार जात असल्यासारखी लगबग; बड्या नेत्याच्या विधानानं खळबळ

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 17, 2023 10:48 PM IST

Nana Patole on Maharashtra Govt : सरकार जाताना असते तशी लगबग सध्या मंत्रालयात दिसतेय, असं सूचक वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं आहे.

Mantralaya
Mantralaya

Nana Patole on Maharashtra Govt : मंत्रालयात सध्या एक वेगळीच लगबग सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना काही तरी चाहूल लागल्याचं दिसत आहे. अशी लगबग साधारणपणे सरकारचा कार्यकाळ संपताना किंवा सरकार पडणार असं वाटत असताना होत असते, असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीशांना सोशल मीडियातून ट्रोल केलं जात आहे. यावर भाष्य करताना पटोले यांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल यावर भाष्य करणं योग्य नाही. आम्ही सर्वच जण निकालाची वाट पाहत आहोत. पण मंत्रालयातील लगबग वेगळंच काही सांगते, असं पटोले म्हणाले.

सरन्यायाधीशांना ट्रोल करणं लांछनास्पद

'भाजप किती सत्तापिपासू आहे याचा अंतच नाही, राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडताना सुरतेपासून गुवाहाटीपर्यंत काय-काय झालं, राज्यपालांनी पदाचा कसा दुरुपयोग केला, या सर्व घटना आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी जे काही प्रश्न विचारले, निरीक्षणे नोंदवली, त्यावरून निकाल विरोधात जाण्याची भीती काही लोकांना वाटत आहे. त्यातूनच चंद्रचूड यांना ट्रोल केलं गेले, हा ट्रोल करण्याचा प्रकार गंभीर आणि लांछनास्पद आहे. केंद्रातील सरकारवर कोणाचाच विश्वासच राहिलेला नाही. त्यामुळंच राष्ट्रपतींकडे दाद मागण्यासाठी काँग्रेस खासदार गेले आहेत. ट्रोल करण्याची भाडोत्री व्यवस्था कोणाकडं आहे हे सर्वांना माहीत आहे. सरन्याधीशांना ट्रोल करण्याची हिंमत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.

त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही!

मीरा रोड इथं धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम होणार असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल अपमान करणारे विधान करूनही शिंदे सरकार त्यावर कारवाई का करत नाही? असा आमचा सवाल आहे. आम्हाला आमचे संत महत्वाचे आहेत, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. महाराष्ट्रात येऊन जर संत तुकाराम महाराज यांचा कोणी अपमान करत असेल तर ते अजिबात चालणार नाही. संतांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही.'

IPL_Entry_Point