मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : अमृता फडणवीसांचं ब्लॅकमेलिंग हा त्यांचा कौटुंबिक विषय; संजय राऊतांची खोचक टीका

Sanjay Raut : अमृता फडणवीसांचं ब्लॅकमेलिंग हा त्यांचा कौटुंबिक विषय; संजय राऊतांची खोचक टीका

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 17, 2023 12:05 PM IST

Sanjay Raut on Amruta Fadnavis Blackmailing : अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

Sanjay Raut - Amruta Fadnavis - Devendra Fadnavis
Sanjay Raut - Amruta Fadnavis - Devendra Fadnavis

Sanjay Raut on Amruta Fadnavis Blackmailing : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना एका डिझायनर महिलेनं ब्लॅकमेल करून १ कोटीची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आल्यामुळं खळबळ उडाली आहे. आम्हाला ट्रॅप करण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशय देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे व अप्रत्यक्षरित्या विरोधकांकडं बोट दाखवलं आहे. फडणवीसांच्या या आरोपांना शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. 'फडणवीसांच्या बाबतीत झालेला ब्लॅकमेलिंगचा प्रकार हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. भाजपला दुसऱ्याच्या कुटुंबात घुसण्याची सवय आहे, तशी आम्हाला नाही. आम्ही दुसऱ्याच्या कुटुंबापर्यंत जात नाही. आमच्यावर काही संस्कार आहेत. हे प्रकरण पोलिसात आहे, न्यायालयात आहे. पण गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत ब्लॅकमेलिंग जात असेल तर हे गंभीर आहे, असं राऊत म्हणाले.

‘प्रत्येक गोष्टीसाठी फडणवीसांनी महाविकास आघाडीचं रेकॉर्ड वाजवणं बंद करावं. विरोधकांवर निशाणा साधताना स्वत:कडंही काही बोटं आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं. आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

'कुठल्याही महिलेला ब्लॅकमेल केलं जाऊ नये. हे काय प्रकरण आहे त्याचा तपास पोलिसांनी करावा. आम्हाला या विषयावर वादविवाद करायला लावू नका. तपास होऊ द्या. असे अनेक गुन्हे महाराष्ट्रात घडत आहेत. विरोधकांना सीबीआय, ईडी, आर्थिक गुन्हे शाखेकडून ब्लॅकमेल केलं जातंय. त्यावर फडणवीस का बोलत नाहीत. त्यांचे खासमखास राहुल कुल यांच्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील ५०० कोटींच्या मनी लाँडरिंगचं प्रकरण आम्ही पुराव्यासह दिलंय. हिंमत असेल तर त्यांनी त्यावर बोलावं. राहुल कुल यांना का वाचवलं जातंय? आधी आपल्या राजवटीत काय चाललंय बघा, मग महाविकास आघाडीच्या कार्यकाळात बोटं घाला, असा बोचरा टोला राऊत यांनी हाणला.

IPL_Entry_Point