मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आदित्य ठाकरेंना दुसरा धक्का! वरळीतील आणखी एक माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार

आदित्य ठाकरेंना दुसरा धक्का! वरळीतील आणखी एक माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 16, 2023 06:57 PM IST

Datta Narvankar to join Eknath Shinde Camp : आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक दत्ता नरवणकर हे एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश करणार आहेत.

Aaditya Thackeray - Datta Narvankar
Aaditya Thackeray - Datta Narvankar

Datta Narvankar to join Eknath Shinde Camp : शिवसेनेतील फुटीनंतर व केंद्रीय निवडणूक आयोगानं संपूर्ण पक्षच एकनाथ शिंदे यांना बहाल केल्यानंतर पुन्हा एकदा जोमानं मैदानात उतरलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. आमदार, खासदारांनंतर आता शिंदे गटानं ठाकरेंचे नगरसेवक आपल्या गोटात खेचण्याचे प्रयत्न चालवले आहेत. विशेषत: युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेनं लक्ष्य केंद्रीत केलं असून तिथला दुसरा मोहरा फोडला आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक दत्ता नरवणकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यापूर्वी माजी नगरसेवक संतोष खरात यांनी हाच निर्णय घेतला होता. त्यानंतर नरवणकर देखील जात असल्यानं आदित्य ठाकरे यांच्यापुढं मतदारसंघातील फूट रोखण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं राज्यातील सत्ता काबीज केल्यानंतर मुंबई महापालिका हे भाजपचं प्रमुख लक्ष आहे. त्यासाठी पुन्हा एकदा शिंदे गटाची मदत भाजपला होणार आहे. शिंदे गटही मुंबई महापालिकेत आपला प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळंच मूळ शिवसेनेचे माजी नगरसेवक जास्तीत जास्त संख्येनं आपल्या बाजूला वळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत अद्याप शिंदे गटाला त्यात फारसं यश आलेलं नसलं तरी वरळीतील दुसरा नगरसेवक फोडण्यात यश आलं आहे.

वरळी हा आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. शिवसेनेत फूट पडल्यापासून आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावत शिंदे सेनेवर हल्ले सुरू केले आहेत. त्यांच्या सभांना उत्तम प्रतिसादही मिळत आहेत. त्यामुळंच आदित्य यांना मतदारसंघातच घेरण्याची शिंदे गटाची रणनीती आहे. त्यातूनच माजी नगरसेवकांना गळाला लावलं जात आहे.

वरळी विधानसभेचे माजी आमदार सुनील शिंदे व सचिन अहिर हे दोघेही विधान परिषदेवर आहेत. महापौर किशोरी पेडणेकर या देखील याच मतदारसंघात येतात. त्यामुळं अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं पारडं तिथं जड आहे. मात्र, नगरसेवकांची गळती अशीच सुरू राहिल्यास आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना वरळीवरही लक्ष्य केंद्रीत करावं लागणार आहे. त्याचा परिणाम राज्यातील प्रचारावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शिंदे गटाच्या या रणनीतीला आदित्य कसा काटशह देतात, हे पाहावं लागणार आहे.

IPL_Entry_Point