मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajan Salvi : ठाकरेंच्या शिवसेनेमागे ससेमिरा सुरूच; राजन साळवी यांच्या कुटुंबीयांना ACB ची नोटीस

Rajan Salvi : ठाकरेंच्या शिवसेनेमागे ससेमिरा सुरूच; राजन साळवी यांच्या कुटुंबीयांना ACB ची नोटीस

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 16, 2023 11:13 AM IST

ACB Notice to Rajan Salvi Family : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांना एसीबीनं नोटीस पाठवली आहे.

Rajan Salvi
Rajan Salvi

ACB Notice to MLA Rajan Salvi Family : शिवसेनेत फूट पडल्यानंतर व राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यातील कुरघोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदार, खासदारांची प्रकरणं थंड बस्त्यात गेली असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या लोकप्रतिनिधींमागे चौकशीचा ससेमिरा सुरूच आहे. अनिल परब यांच्यानंतर राजापूरचे आमदार राजन साळवी हे रडारवर आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) नोटीस धाडली आहे.

राजन साळवी यांनी स्वत: विधान भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. त्यानुसार त्यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला एसीबीनं नोटीस पाठवली आहे. २० मार्च रोजी त्यांना अलिबाग येथील कार्यालयात चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आल्याचं ते म्हणाले.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात याआधी राजन साळवी यांची तीनदा चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या स्वीय सहाय्यकाचीही चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर आता कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी होणार आहे. ‘कुटुंबीयांना नोटीस पाठवणं हे दुर्दैवी आहे, असं राजन साळवी म्हणाले.

'बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आमदार झालेला मी एक सर्वसामान्य कुटुंबातील शिवसैनिक आहे. संपूर्ण मतदारसंघाला व जिल्ह्याला माझ्याबद्दल माहिती आहे. मी कुठल्याही चौकशीला घाबरत नाही. पहिल्या दिवसापासून चौकशीला सहकार्य करत आहे आणि यापुढंही करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

भाजपमधील भ्रष्ट लोकांची नावं जगजाहीर आहेत, पण…

राजकीय हेतूनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला टार्गेट केलं जातंय, असा आरोप त्यांनी केला. 'पहिली नोटीस वैभव नाईक यांना आली, दुसरी नोटीस मला आणि तिसरी नोटीस नितीन देशमुख यांना आली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या आमदारांना नोटीस पाठवल्या जात आहेत. भाजपमध्ये अनेक भ्रष्ट मंडळी आहेत आणि त्यांची नावं मीडियालाही माहीत आहेत, पण त्यांना नोटीस येत नाही. भाजपच्या वाशिंग मशिनमध्ये ते स्वच्छ धुवून निघाले आहेत, फक्त आम्ही दोषी आहोत, अशी सरकारची भूमिका आहे, असा त्रागा त्यांनी व्यक्त केला. आज सर्व सत्ता ताब्यात असल्यानं आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. पण महाराष्ट्राची जनता त्यांना जागा दाखवून देईल, असा इशारा राजन साळवी यांनी दिला.

IPL_Entry_Point

विभाग