Sanjay Raut : या राज्याला मुख्यमंत्री नाही, मख्खमंत्री आहे; संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.
Sanjay Raut on Eknath Shinde : 'या राज्याला मुख्यमंत्री नाहीच आहे, या राज्याला मख्खमंत्री आहे. सगळं मख्खपणे सुरू आहे. मुख्यमंत्री असते तर राज्याची अशी अवस्था झाली नसती, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील सध्याच्या विविध आंदोलनांवर बोलताना ते सतत देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत होते. 'राज्यात सध्या अस्वस्थता, खदखद आहे. शेतकरी, बेरोजगार रस्त्यावर उतरले आहेत. लोक खूष नाहीत. त्याकडं फडणवीसांनी लक्ष द्यायला हवं. महाराष्ट्रातील खरे सूत्रधार तेच आहेत, असं राऊत म्हणाले.
त्यांच्या या विधानावर तुम्ही मुख्यमंत्र्यांना अनुल्लेखानं मारत आहात का, असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर ते म्हणाले, ‘या राज्याला मुख्यमंत्री नाहीच आहे, मख्खमंत्री आहे. त्यांच्या हातात काहीच नाही, सगळी सूत्रं देवेंद्र फडणवीसांकडं आहेत. मुख्यमंत्री फक्त ४० खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम करतायत.’
'या राज्यात सरकारच अस्तित्वात नाही. त्यामुळं सगळा गदारोळ, अराजक माजलंय. शेतकऱ्यांच्या मोर्चाचं वादळ ठाण्यापर्यंत येऊन पोहोचलंय. अराजकाची ठिणगी पडली तर महाराष्ट्रात वणवा पेटू शकतो. दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्य करतायत. महाराष्ट्र लुटायला, खतम करायला निघालेत हे लोक. महाराष्ट्रात अस्थिरता माजवली जात आहे. त्या विरोधात महाविकास आघाडी रान उठवणार आहे. त्याशिवाय, उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या माध्यमातून सभा घेणार आहेत, असं राऊत म्हणाले.
'देवेंद्र फडणवीसांचे हातही दगडाखाली आहेत. त्यांना ते काढताही येत नाहीत आणि दगडाखाली ठेवताही येत नाहीत, अशी अवस्था आहे, असं राऊत म्हणाले.