मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Free Devdarshan : ज्येष्ठ नागरिकांना आता मोफत देवदर्शन; प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Free Devdarshan : ज्येष्ठ नागरिकांना आता मोफत देवदर्शन; प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 14, 2023 09:52 AM IST

Chief Minister Eknath Shinde : राज्यातील जेष्ठ नागरिकांना एसटीद्वारे देवदर्शनाची घडवण्याची तयारी शिंदे-फडणवीस सरकारकडून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra Chief Minister Eknath Shinde
Maharashtra Chief Minister Eknath Shinde (PTI)

Free Devdarshan For Senior Citizens In Maharashtra : महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना एसटीत प्रवास करताना करताना त्यांच्याकडून कोणतेही प्रवासभाडे न आकारण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानंतर आता जेष्ठ नागरिकांना सरकारकडून देवदर्शनाची मोफत सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळामार्फत नागरिकांना तिर्थक्षेत्रांना भेटी देण्यात येणार असल्याचा मेगा प्लॅन तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळं आता दिल्ली आणि उत्तरप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही जेष्ठ नागरिकांना मोफत तिर्थक्षेत्राला भेट देता येणार आहे.

प्रत्येक महिन्याच्या वीकेंडला म्हणजेच शनिवार आणि रविवारी जेष्ठ नागरिकांना सरकारकडून देवदर्शन घडवण्यात येणार असून त्यासाठी महामंडळानं दोन हजार एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तिर्थस्थळांना भेटी देण्यासाठी जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सोय करण्यात येणार असून तसा प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी संचालक मंडळाच्या बैठक घेतली असून त्यात मोफत देवदर्शनाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

मोफत देवदर्शनाचा लाभ घेणाऱ्या राज्यातील जेष्ठ नागरिकांना केवळ प्रवासभाडं माफ करण्यात येणार आहे. देवदर्शनावेळी राहण्याचा आणि जेवणाचा खर्च मात्र नागरिकांना करावा लागणार आहे. त्यामुळं आता या योजनेमुळं एसटी महामंडळावर अतिरिक्त खर्चाचा बोजा बसणार आहे. सध्या महाराष्ट्रात ६५ वर्षांवरील नागरिकांना ५० टक्के प्रवास सवलत तर ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास देण्याची योजना सुरू आहे. परंतु आता देवदर्शनाच्या योजनेत मात्र सर्वच जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

IPL_Entry_Point