मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : ‘तपासयंत्रणा हातात असल्या की फडणवीस यांच्यासारखे पायलीचे पन्नास चाणक्य निर्माण होतात’

Sanjay Raut : ‘तपासयंत्रणा हातात असल्या की फडणवीस यांच्यासारखे पायलीचे पन्नास चाणक्य निर्माण होतात’

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 14, 2023 09:02 AM IST

Saamna Editorial Today : फडणवीसांनी संकेत देऊनही काँग्रेसला जाग आली नाही. आता केवळ एका आमदारकीसाठी तांबेंनी प्रतिष्ठा घालवल्याचं सांगत खासदार संजय राऊतांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना कानपिचक्या दिल्या.

Sanjay Raut On Devendra Fadnavis
Sanjay Raut On Devendra Fadnavis (HT)

Sanjay Raut On Devendra Fadnavis : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरत वडील सुधीर तांबे आणि काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांनाच अडचणीत आणलं आहे. परिणामी आता सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असून सत्यजीत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपनंही तिथं उमेदवार दिलेला नाही. त्यामुळं आता यावरून काँग्रेस आणि बाळासाहेब थोरातांवर टीका केली जात असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला सुनावत भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.

संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, तांबे पितापुत्रांनी काँग्रेसला अंधारात ठेवून ऐनवेळी डाव टाकला. त्यामुळं काँग्रेसच्या धुरिणांकडे हात चोळत बसण्याशिवाय काहीही उकलं नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे मंडळींची अनेक दिवसांपासून तशी तयारी सुरू होती. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेतही दिले होते. परंतु त्यानंतरही काँग्रेसला जाग आली नाही आणि एका आमदारकीसाठी तांबेंनी प्रतिष्ठा घालवली, असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेससह सुधीर तांबे यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत आता काँग्रेसचा उमेदवार नसल्यामुळं अनेकजण त्याचं श्रेय भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत आहेत. फडणवीसांच्या चाणक्यगिरीमुळंच हे घडल्याचं बोललं जात आहे. हाती सत्ता आणि केंद्रीय तपास यंत्रणा असली की असे चाणक्य पायलीस पन्नास निर्माण होतात. यात खेळी कमी आणि सत्तेचा गैरवापर जास्त असल्यानं मविआतील समन्वयाच्या अभावामुळं भाजपचा फायदा झाल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर पदवीधर आणि शिक्षकांना भाजपविरोधात रोष व्यक्त करायचा होता. भाजपला सुशिक्षित वर्गाचा पाठिंबा नाही, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं भाजपला हरवण्याची नवी संधी महाविकास आघाडीला होती. परंतु मविआचे पासे उलटे पडले. एकमेकांच्याच पायात पाय घालून भाजपला मोकळं रान करून द्यायचं असं महाविकास आघाडीतील नेत्यांनी परस्पर ठरवून टाकलं आहे का?, नाशिक पदवीधरमधील गोंधळास जबाबदार कोण?, असे सवाल करत संजय राऊतांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना सुनावलं आहे.

IPL_Entry_Point