मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे गटाचा व्हीप न पाळल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर होणार कारवाई; उद्धव ठाकरेंच्या अडचणीत मोठी वाढ

शिंदे गटाचा व्हीप न पाळल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर होणार कारवाई; उद्धव ठाकरेंच्या अडचणीत मोठी वाढ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 19, 2023 10:51 AM IST

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर आता ठाकरे गटाच्या आमदारांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Eknath Shinde vs Uddhav Thackeray (HT)

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळं राज्यात राजकीय वादंग पेटलं आहे. ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या असून आज उद्धव ठाकरेंनी मातोश्रीबाहेर येत शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेवर शिंदे गटाचं वर्चस्व निर्माण झाल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई केली जाणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. याशिवाय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाकडून शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप जारी केला जाणार असून त्याचं पालन न केल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई केली जाणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेतील आमदारांसाठी व्हीप जारी करण्यात येणार आहे. हा व्हीप ठाकरे गटातील आमदारांनाही लागू होणार असून त्याचं पालन त्यांनी केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं आमदार शिरसाट यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळं विधीमंडळात भारत गोगावले यांनी जारी केलेला व्हीप अधिकृत मानला जाणार आहे.

सध्या ठाकरे गटाकडे १५ आमदार आणि सहा खासदार आहेत. याशिवाय राज्यसभेतील तीन खासदारही ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळं आता शिंदे गटानं विधीमंडळात व्हीप जारी केला आणि ठाकरे गटानं त्याचं पालन केलं नाही तर ठाकरे गटाचे सर्व आमदार निलंबित होऊ शकतात, याशिवाय त्यांच्यावर अपात्रतेचीही कारवाई होण्याची शक्यता आहे. अशीच अवस्था संसदेत ठाकरे गटाच्या सहा खासदारांची असणार आहे. त्यामुळं आता यावरून ठाकरे आणि शिंदे गटात आगामी काळात मोठा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL_Entry_Point