मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर गेला तेव्हा पंतप्रधान काय म्हणाले होते?; एकनाथ शिंदेंनी विधानसभेत सांगितलं

फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर गेला तेव्हा पंतप्रधान काय म्हणाले होते?; एकनाथ शिंदेंनी विधानसभेत सांगितलं

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 11, 2023 03:34 PM IST

Eknath Shinde on Foxconn Project : महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून होणाऱ्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde speech in Vidhan Sabha Today : वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं होतं. राज्य सरकार केंद्राच्या दबावाखाली काम करत असल्याचे आरोपही झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत या साऱ्या आरोपांना उत्तर दिलं. फॉक्सकॉनचा उद्योग राज्याबाहेर गेल्यानंतर पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेचा तपशीलही त्यांनी सांगितला.

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना ते बोलत होते. शिंदे सरकारच्या काळात उद्योग राज्याबाहेर जात असल्याच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिलं. ‘मागच्या सरकारच्या काळात उद्योगाशी संबंधित मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक १७ ते १८ महिने झालीच नव्हती. आता मात्र उद्योग बाहेर जात असल्याची आवई उठवली जातेय. वेगवेगळ्या कंपन्यांची नावं घेतली जातायत. दोन-तीन महिन्यांत एखादा उद्योग किंवा कारखाना येतो आणि निघून जातो, असं कधी होतं का? असं कधी होत नाही. त्याची तयारी असते, परवानग्या असतात. बऱ्याच गोष्टी असतात. ह्या सगळ्याला कोण जबाबदार होतं हे सर्वांना माहीत आहे, असं मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले.

फॉक्सकॉनच्या प्रकरणात ओरड झाल्यानंतर मी स्वत: मोदी साहेबांना फोन केला होता. त्यांना याबद्दल विचारलं होतं. 'कुठलीही मोठी कंपनी किंवा मोठा उद्योग दोन-तीन महिन्यांत निघून जात नाही. त्यावेळच्या सरकारकडून प्रतिसाद मिळाला नाही. हव्या त्या परवानग्या वेळच्या वेळी मिळाल्या नाहीत. शिवाय हे सरकार बदलणार आहे हे त्यांना तरी कुठं माहीत होतं? त्यांना वाटलं आता हे असंच राहणार म्हणून ते निघून गेले, असं त्यावेळी मोदी साहेबांनी मला सांगितलं होतं आणि तीच वस्तुस्थिती आहे, असं एकनाथ शिंदे यांनी ठामपणे सांगितलं.

‘मागील सरकारमध्ये उद्योगाच्या प्लॉटमध्ये कसे घोटाळे होत होते? कोण टक्केवारी मागत होतं? या सगळ्याची चौकशी आता होणार आहे. त्यातून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल,’ असा सूचक इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

IPL_Entry_Point