मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 27, 2022 03:16 PM IST

CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व आमदार पुढच्या महिन्यात अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Rohit Pawar On CM Eknath Shinde Ayodhya Visit
Rohit Pawar On CM Eknath Shinde Ayodhya Visit (HT)

Rohit Pawar On CM Eknath Shinde Ayodhya Visit : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या सर्व आमदारांसह अयोध्येला जाऊन भगवान श्रीरामाचं दर्शन करण्याची योजना आखली आहे. शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच अयोध्येला जाणार असल्यानं त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन कुणाला घ्यायचं असेल तर त्यांनी जायला हवं. मी देखील कुटुंबासाठी अयोध्येला गेलेलो आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाऊन त्यावर राजकारण करणार असतील तर ते योग्य नसल्याचं रोहित पवार म्हणाले. आम्ही धर्माचं राजकारण करत नाही. त्यामुळं आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हातून धर्माचं राजकारण होऊ नये, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असंही पवार म्हणाले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच अयोध्येत...

राज्यात महविकास आघाडीचं सरकार असताना तात्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी अयोध्या दौरा केला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत गेले होते. परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच अयोध्येत जाऊन प्रभू रामाचं दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे सर्व आमदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपनं केला होता विरोध...

यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. परंतु उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी मनसेनं परप्रांतीयांना मारहाण केल्याच्या मुद्द्यावरून आधी माफी मागावी त्यानंतरच अयोध्येला यावं, अन्यथा अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

IPL_Entry_Point