Bringle Price : कांद्यानंतर वांग्याने शेतकऱ्यांना रडवले.. प्रति किलो केवळ २७ पैशांचा दर
Brinjalprice low : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात वांग्याला २७पैसे किलोचा दर मिळाला आहे. त्यामुळे कांद्यानंतर आता वांगीहीकवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
राज्यात व विधानसभेत कांदा दराचा विषय गाजत असताना आता वांग्यानेही बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे. सोलापुरात एका शेतकऱ्याला ५१२ किलो कांद्याच्या बदल्याच केवळ २ रुपयांचा चेक तर दुसऱ्या शेतकऱ्याला ८०० किलो कांदा विकल्यानंतर पदरचे पैसे व्यापाऱ्याला द्याव्या लागल्याच्या घटना ताज्या असताना कोल्हापुरात एका शेतकऱ्याला प्रतिकिलो वांगी २७ पैसे दर मिळाला आहे. यावर अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात वांग्याला २७ पैसे किलोचा दर मिळाला आहे. त्यामुळे कांद्यानंतर आता वांगेही कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
कोल्हापुरातील शिरोळ तालुका हा फळभाज्या व पालेभाज्या पिकांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथे कृष्णा नदीकाठची काटेरी वांगी प्रसिद्ध आहेत. मात्र आता या वांग्यांना कवडीमोल भाव मिळत आहे. शिरोळ तालुक्यातील विक्रमसिंह जगदाळे या शेतकऱ्याने आपल्या शेतात वांग्याचे उत्पादन घेतले होते. त्यांनी शेतीतील संपूर्ण माल कोल्हापूर जवळील पेठ वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला होता. मात्र आज त्यांच्या वांग्याला प्रति किलो २७ पैसे इतका निचांकी दर मिळाला आहे.
यातून शेतकऱ्याचा वाहतूक खर्च देखील निघाला नसून रात्रंदिवस शेतात राबवून शेतकऱ्याच्या हाती अखेर निराशा पडली आहे. बाजारात ग्राहक २० ते ३० रुपये किलो दरानं वांगी खरेदी करत आहेत. मात्र शेतक-याच्या हातात केवळ २७ पैसे पडत आहेत. आजपर्यंतचा हा सर्वात नीचांकी दर आहे.
वांगी पिकवून केवळ २७ पैसे दर मिळत असेल तर कसे जगायचे, असा प्रश्न शेतकरी करत आहेत. शेतकऱ्याला फक्त वांगी तोडणी आणि वाहतूक खर्चासाठी अडीच हजार रुपयांचा खर्च आला. एकीकडे शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्चही निघत नसताना दुसरीकडे बाजारात ग्राहकांना ३० ते ४० रुपये किलो भावाने वांगी मिळत आहेत. यावर देखील शेतकऱ्यांनी सवाल केले आहेत. २७ पैसे किलो दराने वांगी शेतकऱ्यांकडून घेऊन ग्राहकांना जर ४० रुपये दराने मिळत असतील, तर यामधील तफावत तपासण्याची गरज असल्याचे शेतकरी जगदाळे यांनी म्हटले आहे.