मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कुणाला आनंद शिंदेंना ऐकायचंय, तर कुणाला सत्तार शेठचं भाषण; शिंदे गटाच्या मेळाव्यात शिवसैनिक किती?

कुणाला आनंद शिंदेंना ऐकायचंय, तर कुणाला सत्तार शेठचं भाषण; शिंदे गटाच्या मेळाव्यात शिवसैनिक किती?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Oct 05, 2022 03:17 PM IST

Eknath Shinde BKC Rally: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दसरा मेळाव्यास येत असलेल्या लोकांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या उत्तरांची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde

BKC Dasara Melava: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचीच चर्चा आहे. शिवसेनेतून फुटून भाजपसोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिंदे गटानं आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत मुंबईतील बीकेसी मैदानावर मेळाव्याचं आयोजन केलं आहे. तर, शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्कवर होत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापेक्षा जास्त गर्दी जमवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यभरातून माणसं मुंबईत येत आहेत. मात्र, मेळावा नेमका कोणाचा हेच लोकांना सांगता येत नसल्याचं समोर आलं आहे.

शिवसेनेत बंड केल्यानंतरचा शिंदे गटाचा हा पहिलाच मोठा मेळावा आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार आपापल्या मतदारसंघातून बसगाड्या भरून कार्यकर्ते आणणार आहेत. मात्र, यात खरे शिवसैनिक कमी आणि मुंबई दर्शनासाठी व मोफत फिरायला मिळतंय म्हणून येणारे हवशे-गवशेच अधिक असल्याचं दिसत आहे. 

मेळाव्यासाठी मुंबईकडं निघालेल्या तरुण-तरुणींशी व वयोवृद्धांशी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता धक्कादायक उत्तरं मिळाली. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मेळाव्यासाठी शेकडो बस बुक केल्या आहेत. त्यांच्या सिल्लोडसह आसपासच्या मतदारसंघातून हजारो लोक मेळाव्याला येत आहेत. मात्र, मुंबईत नेमक्या कोणाच्या मेळाव्यासाठी जात आहोत? तिथं कोण भाषण करणार आहे? दसरा मेळाव्याबद्दल काही माहिती आहे का? यापैकी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं लोकांना माहीत नसल्याचं समोर आलं आहे. काहींना तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नावही माहीत नसल्याची परिस्थिती आहे. 

आनंद शिंदे यांना ऐकण्यासाठी आम्ही मुंबईला जातोय, असं काही जण सांगत आहेत. तर, सत्तार शेठ यांची सभा आहे म्हणून मुंबईला चाललो आहे असं बहुतेक जण सांगत आहेत. सत्तार यांनी बुक केलेल्या गाडीतून निघालेल्या एका व्यक्तीनं तर उद्धव साहेबांच्या सभेला चाललोय, असंच उत्तर दिलं. त्यामुळं शिंदे गटाच्या मेळाव्यात शिवसैनिक किती आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ गर्दी जमवून ताकद दाखवणं एवढाच मेळाव्याचा हेतू असल्याचं बोललं जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग