मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Andheri East Bypoll: मुंबईतील पोटनिवडणूक महाराष्ट्रभरात गाजणार; काँग्रेसनं घेतला मोठा निर्णय
Uddhav Thackeray - Nana patole
Uddhav Thackeray - Nana patole

Andheri East Bypoll: मुंबईतील पोटनिवडणूक महाराष्ट्रभरात गाजणार; काँग्रेसनं घेतला मोठा निर्णय

05 October 2022, 13:12 ISTGanesh Pandurang Kadam

Andheri East Bypoll: मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता काँग्रेसनं आपली भूमिका जाहीर केली आहे.

Congress with Uddhav Thackeray in Andheri East bypoll: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पहिल्या पोटनिवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीनंतर काँग्रेसकडूनही बळ मिळालं आहे. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवार उभा न करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. त्याऐवजी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनामुळं अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. शिंदे गटानं अद्याप आपला उमेदवार जाहीर केला नसल्यामुळं शिवसेना विरुद्ध भाजप अशी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून ऋतुजा लटके तर, भाजपकडून मूरजी पटेल हे रिंगणात आहेत. काँग्रेस शिवसेनेच्या बाजूनं आपली ताकद उभी करणार आहे.

'विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांध भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली होती. राज्यात अडीच वर्षे या महाविकास आघाडीचं सरकार होतं. या सरकारनं शेतकरी कर्जमाफी सारखे अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. करोनासारख्या महाभयंकर संकटकाळात देशात सर्वोत्तम काम केलं. पण सत्तापिपासू भारतीय जनता पक्षानं ईडी, सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडलं. महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपनं केले, ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला. भारतीय जनता पक्षाविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या या निर्णयामुळं शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. अंधेरी पूर्व हा संमिश्र लोकवस्तीचा मतदारसंघ आहे. तिथं काँग्रेसला मानणारा मतदार मोठ्या संख्येनं आहे. यापूर्वी काँग्रेसच्या सुरेश शेट्टी यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळं काँग्रेसच्या निर्णयाचा शिवसेनेला मोठा फायदा होऊ शकतो, असं बोललं जात आहे.