मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Rss Dussehra Rally: We Will Keep Emphasizing The Word Hindu Rashtra For Ourselves, Says Rss Chief Mohan Bhagwat

Mohan Bhagwat: हिंदुराष्ट्राबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान

Mohan Bhagwat
Mohan Bhagwat
Ganesh Pandurang Kadam • HT Marathi
Oct 05, 2022 03:43 PM IST

Mohan Bhagwat on Hindu Rashtra: नागपूर येथील रेशीम बाग मैदानात झालेल्या आरएसएसच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज हिंदुराष्ट्र संकल्पनेबद्दल भूमिका मांडली.

Mohan Bhagwat on Hindu Rashtra in RSS Dussehra Rally: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्याला संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज हिंदुराष्ट्र या संकल्पनेबद्दल महत्त्वाचं विधान केलं. हिंदुराष्ट्र या शब्दासाठी संघ नेहमीच आग्रही राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ट्रेंडिंग न्यूज

देशातील सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा आढावा घेताना भागवत यांनी संघाच्या धोरणाविषयी देखील विचार मांडले. ‘संघाला आता समाजातून स्नेहभाव आणि विश्वास मिळू लागला आहे आणि संघ शक्तिशाली झाला आहे. त्यामुळं आता संघाच्या हिंदुराष्ट्राची संकल्पना लोकांकडून गांभीर्यानं ऐकून घेतली जात आहे. हिंदुराष्ट्राचा आशय अनेकांना मान्य आहे, परंतु केवळ 'हिंदुराष्ट्र' या शब्दास विरोध असणारेही काही जण आहेत. ते या शब्दाऐवजी वेगळा शब्द वापरतात. संघाचा त्याला विरोध नाही. पण ही संकल्पना सुस्पष्ट असावी यासाठी संघ हिंदुराष्ट्र या शब्दासाठीच आग्रही राहणार आहे, असं ते म्हणाले.

'संघाकडून किंवा संघटित हिंदू समाजाकडून धोका असल्याची अकारण भीती अल्पसंख्यांकांमध्ये पसरविली जात आहे. मात्र त्यात तथ्य नाही. यापूर्वी असं कधी घडलं नाही आणि यापुढंही घडणार नाही. कारण हिंदूंचा तो स्वभाव नाही आणि संघाचाही स्वभाव किंवा इतिहास तसा नाही. अन्याय, अत्याचार, द्वेषभावनेतून समाजात गुंडगिरी करणाऱ्या सामाजिक शत्रूंपासून स्वतःचं व आप्तांचं रक्षण करणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य असतं. सक्षम हिंदू समाज निर्माण करणं ही काळाची गरज आहे. यात कोणाला विरोध करण्याचा प्रश्नच नाही. समाजात बंधुभाव, सभ्यता आणि शांती राखण्याकरिता संघ संपूर्ण दृढनिश्चयानिशी काम करत राहणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

‘काळजीपोटीच तथाकथित अल्पसंख्याकांचे काही नेते भेटीगाठींसाठी येत असतात. संघाच्या काही पदाधिकाऱ्यांशी त्यांचा संवाद झाला आहे, यापुढंही होत राहील. भारत हे प्राचीन राष्ट्र आहे, एक राष्ट्र आहे. भारताची ही ओळख व परंपरांमध्ये सहभागी होऊन आपल्या आपल्या वैशिष्ट्यांसह परस्परांसोबत राहून प्रेम, सन्मान व शांतिभावानं निस्वार्थपणे राष्ट्रसेवा करत राहू. परस्परांच्या सुखदुःखाचे साथीदार होऊ, भारताची ओळख करून घेऊ, भारतीय होऊ. हीच एकात्म, समरस राष्ट्राची संघाची संकल्पना आहे. यामध्ये संघाचा कोणताच स्वार्थ किंवा उद्देश नाही,’ असं भागवत यांनी सांगितलं.

उदयपूरच्या घटनेचा उल्लेख

उदयपूरमध्ये एका इसमाच्या झालेल्या हत्येचा उल्लेख यांनी मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात केला. 'काही दिवसांपूर्वी उदयपूरमध्ये एक अत्यंत निद्य घटना घडली. संपूर्ण समाज हादरून गेला. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. अशा घटनांमागे संपूर्ण समाज कधीच नसतो. त्या घटनेनंतर मुस्लिम समाजातील काही प्रमुख व्यक्तींनी निषेध नोंदविला. निषेधाची ही भावना अपवादात्मक राहू नये, तर अधिकाधिक मुस्लिम समाजाचा हा स्वभाव व्हायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.