मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik MLC Election : नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपची तिरकी चाल; नेत्यांच्या बैठकीत मोठा निर्णय

Nashik MLC Election : नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपची तिरकी चाल; नेत्यांच्या बैठकीत मोठा निर्णय

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 27, 2023 03:03 PM IST

Nashik Graduate Constituency Election : बंडखोरीमुळं चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात भाजपनं मोठा निर्णय घेतल्याचं समजतं.

Devendra Fadnavis - Satyajeet Tambe
Devendra Fadnavis - Satyajeet Tambe

BJP to support Satyajeet Tambe in Nashik MLC Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शेवटपर्यंत उमेदवार न देणाऱ्या व पाठिंब्याबाबत कुठलीही भूमिका न घेणारा भाजप निर्णयाप्रत आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसविरोधात बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपनं घेतल्याचं समजतं. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच नाशिक पदवीधर मतदारसंघाची चर्चा सुरू आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी ऐनवेळी अर्जच दाखल न केल्यानं काँग्रेसची मोठी नाचक्की झाली. सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्षाच्या छुप्या पाठिंब्यामुळंच तांबे पिता-पुत्रांनी हे नाट्य घडवून आणल्याचं बोललं जात होतं. त्यामुळं अपक्ष उमेदवारी करणाऱ्या सत्यजीत तांबे यांना भाजप पाठिंबा देईल, असा अंदाज होता. मात्र, महाविकास आघाडीनं आपला उमेदवार जाहीर करूनही भाजपनं भूमिका जाहीर केली नव्हती.

भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांची आज ऑनलाइन बैठक झाली. त्यात सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत निर्णय झाल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

बाळासाहेब थोरात यांचं काय?

सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. तांबे हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष देखील होते. त्यांनी केलेल्या बंडखोरीमुळं थोरात यांची आधीच कोंडी झाली आहे. त्यात भाजपच्या निर्णयानं भर पडण्याची शक्यता आहे. भाजपनं तांबे यांना अधिकृत पाठिंबा दिल्यास थोरात हे नेमकी काय भूमिका घेणार, याकडं काँग्रेस पक्षाचं लक्ष लागलं आहे. नाशिक मतदारसंघातील घडामोडींवर थोरात यांनी अद्याप चकार शब्दही काढलेला नाही. ते कधी बोलणार याबद्दलही उत्सुकता आहे.

IPL_Entry_Point