मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashish Shelar: 'अमित शहांना आव्हान देण्याआधी उद्धव ठाकरेंनी आरशासमोर उभं राहावं'

Ashish Shelar: 'अमित शहांना आव्हान देण्याआधी उद्धव ठाकरेंनी आरशासमोर उभं राहावं'

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 24, 2022 06:34 PM IST

Ashish Shelar Slams Uddhav Thackeray: मुंबईतील मेळाव्यातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Ashish Shelar Slams Uddhav Thackeray: 'अमित शाह यांना आव्हान देण्याआधी उद्धवजी ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अमितभाईंना आव्हान देण्याआधी उद्धव ठाकरे यांनी आरसा घेऊन उभं राहावं, म्हणजे आपण ज्यांना आव्हान देतोय त्यांच्या ताकदीसमोर आपण कुठे उभे आहोत, हे त्यांना कळेल, अशी बोचरी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मुंबईत अलीकडंच झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना एका महिन्यात महापालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा, असं जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना दिलं होतं. त्यांच्या या आव्हानाचा शेलार यांनी समाचार घेतला. ‘स्वतःच्या हिंमतीवर उद्धव ठाकरे यांनी एकदा तरी महाराष्ट्रात सरकार आणलं आहे का? शिवसेनेचे १०० आमदार तरी निवडून आणले आहेत का? १०० सोडाच, पण ७५ चा आकडा तरी कधी पार केला आहे. असं असताना ज्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकदा नाही तर दोनदा शंभर आमदार निवडून आणले, त्यांना उद्धव ठाकरे यांनी आव्हान देणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे, असं म्हणत, ‘कौआ हंस की चाल नहीं चल सकता’,  असा टोला शेलार यांनी हाणला.

उद्धव ठाकरे यांनी पीएफआयवर का बोलत नाहीत?

पीएफआय संघटनेवरील कारवाईचा निषेध म्हणून पुण्यात जी घोषणाबाजी झाली, त्यास आमचा तीव्र विरोध आहे. अशा प्रवृत्तींना ठेचून काढलं पाहीजे. गृहमंत्री या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा शेलार यांनी यावेळी व्यक्त केली. PFI वर झालेली कारवाई योग्यच आहे. देशात देशविघातक वातावरण निर्माण करण्याचं जे प्रयत्न सुरू आहेत, त्याविरोधात हा लढा आहे. केंद्र सरकारनं अशा प्रवृत्तींना उखडून टाकण्याचं ठरविलं आहे. या कारवाईला आमचं समर्थन आहे, असं शेलार म्हणाले. एरवी विरोधी पक्षातील नेते पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत असतात. मात्र, या लोकांना अनेकदा देशाच्या स्वाभिमानाचा विसर पडतो. काल परवा हजार - दोन हजार लोकांसमोर एनएसईमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकपात्री प्रयोग केला. त्या सभेत पीएफआय किंवा तत्सम दहशतवादी इस्लामी संघटनांवर बोलण्याचे त्यांनी का टाळले?, असा सवाल शेलार यांनी केला.

IPL_Entry_Point