मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashish Shelar: आदित्य ठाकरेंवर टीका करताना आशिष शेलार भलतंच बोलून गेले!

Ashish Shelar: आदित्य ठाकरेंवर टीका करताना आशिष शेलार भलतंच बोलून गेले!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 24, 2022 05:27 PM IST

Ashish Shelar Slams Aaditya Thackeray: राज्यातील उद्योगधंदे व रोजगाराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी कडवट शब्दांत टीका केली आहे.

Ashish Shelar - Aaditya Thackeray
Ashish Shelar - Aaditya Thackeray

Ashish Shelar Slams Aaditya Thackeray: युती तोडून आणि महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेनेनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये कमालीचं राजकीय वितुष्ट आलं आहे. भाजपचे नेते संधी मिळेल तेव्हा शिवसेनेवर टीका करताना दिसतात. ठाकरे कुटुंबीयांबद्दल बोलताना भाजप नेत्यांची भाषा जास्तच कडवट झालेली पाहायला मिळते. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील आज आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना असेच कटू शब्द वापरले. आदित्य ठाकरे यांनी सध्या चहा ऐवजी इतर पेय घ्यायचं ठरविलेलं दिसतं, असं शेलार म्हणाले.

महाराष्ट्रातील उद्योगधंदे व बेरोजगाराच्या संदर्भातील प्रश्नाबाबत शेलार बोलत होते. कोस्टल रोडच्या प्रकल्पावरील कामासाठी चेन्नईत मुलाखती घेण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी अलीकडं केला होता. त्यावरून शेलार यांनी ही टीका केली. 'आदित्य ठाकरे यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. त्यांनी सध्या चहा ऐवजी इतर पेय घ्यायचं ठरविलेलं दिसतं. ते पेय योग्य आणि सुविधाजनक असेल हे पाहावं. चिंतेपोटी माझी त्यांना ही विनंती आहे, असं शेलार म्हणाले. 

'मुंबईतील सहा वेगवेगळ्या ठिकाणी कोस्टल रोड प्रकल्पावर काम करण्याची क्षमता असलेल्या १ हजार ७२५ लोकांची इथंच भरती झाली आहे. कोस्टल रोडसाठी काम करणाऱ्या इंजिनिअर्सची सध्या उपलब्धता नाही. त्यामुळं प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन इतर ठिकाणांहून मनुष्यबळ आणण्याचा निर्णय घेण्यात आला. हे समजून न घेता आरोप केले जात आहेत. वांद्रे - वर्सोवा पुढे बोरीवली-विरारपर्यंतचा कोस्टल रोड आदित्य ठाकरे हे थांबवू पाहत आहेत. ते प्रकल्पविरोधी आहेत, असा आरोप शेलार यांनी केला.

ठाकरेंच्या भूमिकेबद्दल जनतेच्या मनात आक्रोश

राज्यातील उद्योगधंदे बाहेर जात असल्याचा निषेध म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यातील मावळ इथं जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचाही शेलार यांनी समाचार घेतला. 'वीज मोफत किंवा कमी दरात देण्याचं धोरण असताना यांच्या सरकारनं टक्केवारी मागितली. महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला घालवला. चर्चा आणि पायाभरणीमध्ये किती टक्क्यांची वाटाघाटी तुम्ही केली, याचं उत्तर आधी त्यांनी द्यावं, असं शेलार म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या पेंग्विन सेनेची भूमिका महाराष्ट्रातील मराठी मुलांना धांदात फसविणं आणि अमराठी गुजराती माणसाबद्दल द्वेष निर्माण करणारी आहे. जनतेच्या मनात याबद्दल खरा आक्रोश आहे, असं शेलार म्हणाले.

IPL_Entry_Point