मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cabinet Expansion : दिल्लीतून परतताच देवेंद्र फडणवीसांनी दिले मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत, म्हणाले..

Cabinet Expansion : दिल्लीतून परतताच देवेंद्र फडणवीसांनी दिले मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत, म्हणाले..

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 25, 2023 12:24 PM IST

Devendra Fadnavis Live Today : मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळं भाजपा आणि शिंदे गटातील अनेक आमदारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यानंतर आता फडणवीसांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सूचक विधान केलं आहे.

Devendra Fadnavis On Cabinet Expansion
Devendra Fadnavis On Cabinet Expansion (HT)

Devendra Fadnavis On Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी राज्यातील विकासकामं, आगामी महापालिका निवडणुका आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतून विशेष विमानानं औरंगाबादेत दाखल झाले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठं विधान केलं आहे.

औरंगाबादेत माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. हा विषय चर्चेत आलेला नाही. परंतु योग्यवेळी आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत, असं फडणवीस म्हणाले. यापूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलं होतं. परंतु आता गृहमंत्र्यांशी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत कोणतीही चर्चा न झाल्याचं सांगत फडणवीसांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळं आता मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर जवळपास दीड महिने या दोन्ही नेत्यांनी राज्याचा कारभार हाकला होता. त्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाच्या १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यात एकाही महिला आमदाराचा समावेश नसल्यामुळं विरोधकांनी शिंदे-फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता सरकार स्थापन होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्यामुळं सत्ताधारी आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

IPL_Entry_Point