मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Politics : कसबा-चिंचवड पोटनिवडणूक एमआयएम लढवणार; पुण्यातील बैठकीनंतर खासदार जलीलांची घोषणा
Aurangabad MP Imtiaz Jalil
Aurangabad MP Imtiaz Jalil (HT)

Pune Politics : कसबा-चिंचवड पोटनिवडणूक एमआयएम लढवणार; पुण्यातील बैठकीनंतर खासदार जलीलांची घोषणा

24 January 2023, 16:26 ISTAtik Sikandar Shaikh

MP Imtiaz Jalil : पुण्यातील दोन्ही मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत एमआयएमचे उमेदवार निवडणूक लढणार असल्याची घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

Kasba Peth and Chinchwad By-Elections : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात येत्या २७ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपसह राष्ट्रवादीनं रणनीती आखायला सुरुवात केलेली असतानाच आता ओवेसींच्या एमआयएमनंही या निवडणुकीत उडी घेत दोन्ही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पुण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली, त्यानंतर पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं आता पुण्यात महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर खासदार इम्तियाज जलील यांनी पुण्यातील एमआयएमच्या कार्यकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यात पोटनिवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे करण्याविषयी चर्चा करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी दर्शवल्यानंतर खासदार जलील यांनी दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं आता चिंचवड आणि कसब्यात भाजप, राष्ट्रवादी आणि एमआयएम अशी तिरंगी लढत होणार असल्याची शक्यता आहे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांचा टक्का मोठा आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचाही मतदारसंघात प्रभाव आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. त्याचबरोबर चिंचवड विधानसभा मतदारसंघातही दलित आणि मुस्लिम मतदारांची मतं निर्णायक ठरतात. त्यामुळं पुण्यातील या दोन्ही मतदारसंघातील गणितं पाहता एमआयएमनं पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळं याचा भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.