BEST: मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती दिली जात असताना या प्रकल्पात बेस्ट उपक्रमाच्या धारावी आणि काळाकिल्ला डेपोच्या जागेचाही वापर होणार आहे. हे दोन्ही डेपो १२ एकर जागेत वसले आहेत. या जागांसाठी बेस्टला कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था आणि पार्किंगची व्यवस्था करण्याबरोबर अतिरिक्त ५० कोटी रुपये दिले जातील, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्पातील एका अधिकाऱ्याने दिली. नुकताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रतिनिधींनी दोन्ही डेपो ताब्यात घेण्यासाठी संपर्क साधला.
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा अदानी समूह आणि राज्य सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे. या प्रकल्पाला विरोध करताना केंद्रीय नेते शशांक राव म्हणाले की, “बससेवा ही मुंबईतील लोकांसाठी आहे. दररोज लाखो लोक बसने प्रवास करतात, त्यांची गरज भागवण्यासाठी आम्हाला अधिक डेपो आणि बसेसची गरज आहे. अशा परिस्थितीत तुम्ही दोन डेपो ताब्यात घेत असाल तर ते सार्वजनिक वाहतुकीसाठी हानिकारक ठरेल.”
धारावी पुनर्विकास प्रकल्प सुत्राने सांगितले की, डेपोसाठी आखलेली योजना अंतिम टप्प्यात आहे. परंतु, झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी इमारती असतील की झोपडपट्टीतील दुकाने सामावून घेणारे व्यापारी संकुल असेल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही. यासंदर्भात अदानीच्या सूत्रांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले.
बेस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बसेससाठी प्रस्तावित नवीन पार्किंगची जागा बहुमजली असू शकते. "आम्हाला सध्याच्या ३०० बसेसच्या जागी ४६९ बसेससाठी पार्किंगचे आश्वासन देण्यात आले. सध्याच्या बसेसच्या पार्किंगसाठी पर्यायी जागा शोधणे हे आमचे मुख्य आव्हान आहे," असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अनिक डेपो हा एक पर्याय असला तरी शुक्रवारपर्यंत पर्यायी जागा निश्चित करण्यात आली नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मिळलेल्या माहितीनुसार, नव्याने बांधण्यात येणाऱ्या धारावी आणि काळाकिल्ला डेपोमध्ये आधुनिक सुविधा दिल्या मिळतील, असा दावा विकासकाने केला आहे. डेपोमध्ये कार्यालयीन जागा, अधिक सुविधा, अधिक राहण्यायोग्य क्षेत्रासह सुधारित कर्मचारी क्वार्टरसह इतर काही सुविधा मिळतील, असे सांगण्यात आले.