मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : 'सीमाप्रश्नी कर्नाटकला जशास तसं उत्तर द्या; महाराष्ट्राच्या एकजुटीचा मेसेज जाऊ द्या'

Ajit Pawar : 'सीमाप्रश्नी कर्नाटकला जशास तसं उत्तर द्या; महाराष्ट्राच्या एकजुटीचा मेसेज जाऊ द्या'

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 26, 2022 02:50 PM IST

Ajit Pawar on Border Dispute : कर्नाटकला जशास तसं उत्तर देण्याची गरज व्यक्त करत अजित पवार यांनी आज सीमाप्रश्नावर ठरावाची मागणी केली.

Ajit Pawar
Ajit Pawar

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्यानं होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संपूर्ण महाराष्ट्र सीमावासीयांच्या मागे उभा आहे हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. तसा ठराव सभागृहात एकमतानं मंजूर करा. कर्नाटकला जशास तसं उत्तर द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तराच्या तासाआधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीभागातील मराठी माणसांवर होणारा अन्याय आणि कर्नाटक सरकारनं त्यांच्या विधीमंडळात मंजूर केलेल्या ठरावाचा मुद्दा उपस्थित केला. कर्नाटक सरकारच्या आगळीकीला महाराष्ट्रानं 'जशास तसं' उत्तर देण्याची मागणी त्यांनी केली. 'नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधीपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्ये सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही कर्नाटकच्या विधीमंडळात महाराष्ट्रविरोधी ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी करण्यात आली, सीमेवर अटक करण्यात आली. तरीही महाराष्ट्र सरकार गप्प बसलं आहे. सीमाभागातील मराठी माणसांना तिथं बाजू मांडता येत नसल्यानं ते आज कोल्हापूरला येऊन त्यांची बाजू मांडणार आहेत. सीमाभागातील मराठी माणसांवरील कर्नाटकच्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र विधानसभेत एकमतानं ठराव मंजूर करण्यात यावा. कर्नाटक सरकारला 'जशास तसं' उत्तर देण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

'कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक महाराष्ट्रविरोधी वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचत आहेत. कर्नाटकच्या विधीमंडळात सीमाभागासंदर्भातील ठराव मंजूर करताना महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, अस्मितेला धक्का लावण्याचं काम झालं आहे. या आगळीकीला 'जशास तसं' उत्तर दिलं पाहिजे. सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र भक्कमपणे उभा आहे, हा विश्वास देण्यासाठी सीमाभागातील मराठी माणसांच्या लढ्याला संपूर्ण पाठींबा देणारा ठराव आजच सभागृहात एकमतानं मंजूर करावा. सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकजूट आहे. हा संदेश यानिमित्तानं सर्वांपर्यंत पोहचू द्या,' असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं.

IPL_Entry_Point