Disha Salian : आदित्य ठाकरे कोर्टात जाण्याच्या तयारीत?, दिशा सालियन प्रकरणात आरोपांमुळं घेणार निर्णय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Disha Salian : आदित्य ठाकरे कोर्टात जाण्याच्या तयारीत?, दिशा सालियन प्रकरणात आरोपांमुळं घेणार निर्णय

Disha Salian : आदित्य ठाकरे कोर्टात जाण्याच्या तयारीत?, दिशा सालियन प्रकरणात आरोपांमुळं घेणार निर्णय

Published Dec 26, 2022 05:24 AM IST

Aditya Thackeray News Today : दिशा सालियन प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारनं एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय या प्रकरणावरून भाजप आणि शिंदे गटाचे नेते सातत्यानं आदित्य ठाकरेंवर आरोप करत असल्यानं ते कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

Aditya Thackeray News Today
Aditya Thackeray News Today (HT)

Aditya Thackeray News Today : दिशा सालियन आत्महत्येप्रकरणी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाकडून सातत्यानं होत असलेल्या आरोपांमुळं शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आरोप करणाऱ्या नेत्यांविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात तुरुंगात पाठवण्याचं वक्तव्य केल्यानंतर आदित्य ठाकरे त्यांच्यासह अनेक नेत्यांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याशिवाय आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी मुंबईहून शिवसेनेची एक टीमही आज हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात येणार असल्यानं राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. याशिवाय आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याचीही मागणी भाजपकडून करण्यात आली. रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंनी अनेकदा फोन केल्याचा आरोपही शिंदे गटाकडून करण्यात आला होता.

त्यामुळं आता सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी न्यायालयात जाण्याबाबत आदित्य ठाकरेंनी कायदेशीर सल्ला घेतला आहे. त्यानंतर आता सर्व आवश्यक कागदपत्रं एकत्र केल्यानंतर कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं आता यावरून आज हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या