मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Parbhani News : परभणीत हळहळ; सेप्टिक टँक स्वच्छ करताना गुदमरून ५ मजुरांचा मृत्यू

Parbhani News : परभणीत हळहळ; सेप्टिक टँक स्वच्छ करताना गुदमरून ५ मजुरांचा मृत्यू

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 12, 2023 12:45 PM IST

Parbhani Accident News : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात सेप्टिक टँक स्वच्छ करताना पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे.

Parbhani News
Parbhani News

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. शौचालयाच्या सेप्टिक टँकची साफसफाई करताना श्वास गुदमरून पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर, एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

गुरुवार, ११ मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. भाऊचा तांडा शिवारातील एका शेतातील आखाड्यावरच्या सेप्टिक टँकच्या साफसफाईचं काम सहा मजूर करत होते. दुपारी तीन वाजल्यापासून हे काम सुरू होतं. रात्रीच्या वेळी मजुरांना गुदमरू लागले. त्यांना जास्त अस्वस्थ वाटू लागल्यानं आरोग्य यंत्रणेला माहिती देण्यात आली.

मजुरांना तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तिथं पाच जणांना मृत घोषित करण्यात आलं. मृतांमध्ये शेख सादेक, शेख जुनेद, शेख शारोक, शेख नवीद, शेख फेरोज यांचा समावेश आहे. जखमी मजुरास परळीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत मजूर एकाच कुटुंबातील असल्यानं या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मृत सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

IPL_Entry_Point

विभाग