Mosquito Bites Survey: सध्या जगभरातच डास आणि डासवर्गीय किटकांमुळे लोक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणांहून अशा बातम्या कानावर येतच असतात. भारतातही डासांच्या चाव्यामुळे जनता हैराण झाली आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होऊ लागला आहे, हे नुकत्याच एका सर्व्हेतून समोर आले आहे. नुकताच भारतीयांच्या उत्पादनक्षमतेवर एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेतून एका अतिशय धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. भारतात तब्बल निम्म्याहून अधिक लोक हे डासांमुळे हैराण झालेले असून, त्यांची झोपमोड होते आणि याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो.
डास चावून होणाऱ्या झोपमोडीमुळे तब्बल ५८ टक्के भारतीय त्रस्त असून, अपुऱ्या झोपेमुळे भारतीयांमध्ये थकवा येण्याचं प्रमाण वाढल्याचं एका सर्व्हेमध्ये आढळून आलं आहे. जागतिक मलेरिया दिनाच्या निमित्ताने ‘गुडनाइट’द्वारे नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेदरम्यान डासांमुळे झोपेत येणाऱ्या व्यत्ययाचा कामाच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे ६२ टक्के पुरुष आणि ५३ टक्के स्त्रियांनी सांगितले. भारत आर्थिक प्रगतीच्या वाटेवर असताना, कर्मचारी वर्ग निरोगी असणे आवश्यक असताना या पार्श्वभूमीवर हे चित्र धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. मलेरियासारख्या डासांपासून होणाऱ्या आजारांमुळे मिळकत गमावणे आणि उपचार यावर देशाभारत अंदाजे १६००० कोटी रुपयांचा आर्थिक ताण येत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांत डासांमुळे त्रस्त नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या राज्यांत एकूण ६७ टक्के लोकांनी डासांमुळे वारंवार झोपमोड होऊन, त्याचा परिणाम आपल्या उत्पादनक्षमतेवर होतो, असे म्हटले आहे. त्यापाठोपाठ दक्षिण भारत (५७ टक्के) आणि दिल्ली, हरियाण आणि उत्तर प्रदेश (५६ टक्के) लोक डासांच्या समस्येने त्रस्त आहेत. भारताच्या पूर्व भागातील राज्यांमध्ये हे प्रमाण ४९ टक्के एवढे आहे.
याबाबत बोलताना मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. कीर्ती सबनीस म्हणाल्या की, ‘फक्त एका डासामध्येही जीवावर बेतणाऱ्या रोगांचा प्रसार करण्याची क्षमता असते, हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे. गुणगुण करत राहाणारे हे मंद कीटक डेंग्यु, मलेरिया व त्यासारखे इतर भीषण आजार पसरवतात. डासांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते व इतर आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढते. हा कायमस्वरुपी धोरा निरोगी व उत्पादनक्षम जीवनशैलीत अडथळे निर्माण करतो. डासांमुळे होणाऱ्या आजारांपासून स्वतःला आणि समाजाला सुरक्षित ठेवणे ही वैयक्तिक जबाबदारी व कर्तव्य झाले आहे.’
तर, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) प्रमुख विपणन अधिकारी अश्विन मूर्ती म्हणाले की, ‘गुडनाइटच्या ‘वन मस्किटो, काउंटलेस थ्रेट्स’ या राष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सार्वजनिक वर्तन आणि डासांमुळे आजारांचे विश्लेषण मांडण्यात आले आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून भारतात डासांमुळे होणाऱ्या समस्यांविषयी जागरूकता निर्माण करणे व त्यांना वाजवी तसेच, नाविन्यपूर्ण उपाययोजना उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे. भारतात दरवर्षी ४० दशलक्षांपेक्षा जास्त नागरिकांना डासांमुळे मलेरिया, डेंग्यु अशा आजारांचा सामना करावा लागतो. आजारामुळे शाळा, सामाजिक उपक्रम, काम, व्यावसायिक बांधिलकीतून त्यांना रजा घ्यावी लागते. यामुळे आरोग्यसेवांवरचा खर्च वाढतो तसेच उत्पादनक्षमता कमी होते. भारतीय अर्थव्यवस्थेची उत्पादनक्षमता कायम राखण्यासाठी आणि जीडीपी स्कोअर चांगला राखण्यासाठी मनुष्यबळ निरोगी असणे महत्त्वाचे आहे. यावरचा एक चांगला उपाय म्हणजे डासांमुळे होणाऱ्या आजारांचे वाढते प्रमाण रोखणे.’