मुंबईत डासांचा उद्रेक वाढला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत गेल्या दोन महिन्यात ४ हजारांहून अधिक डासांच्या त्रासाच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, डिसेंबर २०२३ आणि जानेवारी महिन्यात डासांच्या प्रादुर्भावाच्या ४ हजार २४१ तक्रारी प्राप्त झाल्याची महिती महापालिकेने दिली आहे. नोव्हेंबर ते मार्च या महिन्यांत क्युलेक्स डासांची उत्पत्ती होते, त्यामुळे तक्रारींमध्ये झपाट्याने वाढ होते, अशीही माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली.
नागरिकांनी निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवल्यास परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते, असे पालिकेचे म्हणणे आहे. 'क्युलेक्स डासांची उत्पत्ती घाण आणि साचलेल्या पाण्यामुळे होते. त्यावर तोडगा निघाल्याशिवाय डासांचा प्रादुर्भाव कायम राहील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
महापालिकेने सांगितले की, जानेवारीमध्ये शहरभरातून १ हजार ७२४ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी १७१५ तक्रारींची दखल घेण्यात आली. डिसेंबर २०२३ मध्ये २ हजार ५०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. २२७ नगरसेवक प्रभागात प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले असून त्यांना एक फॉगिंग मशीन देण्यात आली आहे. “पावसाळ्यानंतर नाले कोरडे पडतात; आम्ही फक्त बेकायदा सांडपाण्याचा शोध घेतला आहे. जोपर्यंत ते थांबवले जात नाही आणि नागरिक उघड्यावर कचरा फेकणे थांबवत नाहीत, तोपर्यंत डासांची संख्या वाढतच राहणार आहे”, असा इशाराही अधिकाऱ्याने दिला आहे.
या हंगामात महापालिका झोपडपट्टी आणि एसडब्ल्यूडीमध्ये डासांची उत्पत्ती करणाऱ्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करत आहे.' डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांच्या ठिकाणांप्रमाणे इमारतीच्या पाण्याच्या टाक्यांची तपासणी करण्याची गरज नाही. त्याऐवजी, आम्ही शक्य तितक्या एसडब्ल्यूडी आणि झोपड्यांची तपासणी करतो. प्रचंड तक्रारींमुळे आम्ही हे एसडब्ल्यूडी उघडतो, कीटकनाशकांची फवारणी करतो आणि डासांची संख्या वाढू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे, अशीही माहिती अधिकाऱ्याने दिली.
मुंबई नॉर्थ सेंट्रल डिस्ट्रिक्ट फोरमचे संस्थापक अॅड. त्रिवनकुमार कर्नानी म्हणाले की, महापालिकेने प्रत्यक्ष कारवाईचा दावा केला असला तरी डासांच्या प्रादुर्भावाचा मुद्दा कायम आहे. महापालिकेने मनुष्यबळ वाढविण्याची नितांत गरज आहे. सध्या तक्रारींवर बीएमसीच्या प्रतिसादात उशीर होत आहे. त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना काही दिवस लागतात. तक्रारींकडे लक्ष न दिल्यास डासांची समस्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे,' असे कर्नाणी यांनी सांगितले.