Tu Chal Pudha Latest update: अश्विनीची प्रेरणादायी कथा सांगणारी ‘तू चाल पुढं’ ही मालिका आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत एका सामान्य गृहिणीचा आपल्या पायावर उभं राहण्याचा धडाडीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सध्या अश्विनीसमोर अनेक नवी संकटं उभी ठाकली असून, ती सगळ्या परिस्थितीला अतिशय धीराने सामोरी जात आहे. एकीकडे आर्थिक समस्यांना तोंड देत असताना आता मुलींच्या संगोपनाचा नवा प्रश्न तिच्यासोर आ वासून उभा राहिला आहे.
शिल्पीच्या खेळीला बळी पडून घराबाहेर निघालेली अश्विनी आता स्वतःचा संसार नव्याने उभा करत आहे. यात तिला पती श्रेयससह अनेकांची साथ मिळत आहे. एकीकडे घर, संसार सांभाळून दुसरीकडे ती पार्लरची जबाबदारी देखील अतिशय संयमाने सांभाळत आहे. मात्र, या सगळ्यात तिच्या समोर आता तिच्या मुलींच्या भविष्याचा प्रश्न उभा राहणार आहे. अश्विनी आणि श्रेयस दोघेही बाहेर असल्याने कुहू एकटी पडली आहे. तर, मयुरीच्या आयुष्यात आता पुन्हा एकदा प्रेम फुलू लागलं आहे.
अश्विनीला ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेत असिस्ट करणारा प्रतीक आता मयुरीचा चांगला मित्र झाला आहे. इतकचं नाही तर, त्याने घर सोडून बाहेर पडलेल्या अश्विनीच्या कुटुंबाला एखाद्या मुलाप्रमाणे आधार दिला आहे. प्रतीकनेच स्वतःचं घर अश्विनीला राहण्यासाठी देऊन, त्यांचा मोठा प्रश्न सोडवला होता. मात्र, या दरम्यान प्रतीक आणि मयुरी यांची मैत्री आता हळूहळू प्रेमाचं रूप धारण करत आहे. प्रतीकने आधीच मयुरीकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तर, मयुरीने मात्र अद्याप त्याला उत्तर दिलेले नाही.
आता त्यांच्या याच प्रेमाच्या नात्याची कुणकुण अश्विनीला लागणार आहे. या आधी मयुरीवर एकदा नव्हे तर दोनदा संकट कोसळलं आहे. त्यामुळे अश्विनीला तिची खूप काळजी वाटत आहे. आता अश्विनीचा हाच पूर्वग्रह मयुरीच्या नात्यात अडथळा ठरण्याची शक्यता आहे. मयुरी आणि प्रतीकच्या नात्याबद्दल कळल्यावर अश्विनीची प्रतिक्रिया काय असणार? ती या नात्याला होकार देणार का?, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.