Trupti Desai Support Gautami Patil: आपल्या नृत्य अदांनी सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ हा सूर सध्या सर्वत्रच ऐकू येत आहे. काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक मंचावर अश्लील हावभाव करत नृत्य केल्यामुळे गौतमी पाटील प्रचंड चर्चेत आली होती. या नृत्यामुळे गौतमी पाटीलवर अनेक स्तरांतून टीका करण्यात आली. गौतमीच्या कार्यक्रमात नेहमीच काहीना काही हंगामा होतो. कधी हाणामारी, तर कधी चेंगराचेंगरी हे प्रकार घडत असल्याने देखील तिच्यावर टीका केली जाते. अनेक स्तरांतून टीका होत असताना मात्र, तृप्ती देसाई यांनी आता गौतमीला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
गौतमी पाटीलच्या नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत असतात. तर, तिच्याबद्दल नेहमीच काहीना काही चर्चा या सुरू असतातच. काहीच दिवसांपूर्वी गौतमीच्या मानधनावर टीका करत इंदुरीकर महाराज यांनी वक्तव्य केलं होतं. तर, प्रिया बेर्डे यांनी देखील गौतमी पाटीलच्या नृत्यावर भाष्य केलं होतं. मात्र, या दरम्यान आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी यांनी त्यांच्या एका मुलाखतीत गौतमी पाटील हिला पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं आहे.
‘बिग बॉस मराठी’सारख्या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी नुकतीच एक युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी गौतमी पाटील विषयी वक्तव्य केलं आहे. यात त्यांनी गौतमी पाटीलला पाठिंबा द्यावा असं म्हटलं आहे. या मुलाखतीत त्यांना गौतमीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ‘गौतमी पाटील सर्वसामान्य घरातून आलेली मुलगी आहे. तिला आपण पाठिंबा द्यायला हवा. जेव्हा तिला कुणी विरोध करतं, तेव्हा सर्वसामान्य जनता तिच्यामागे उभी राहते. याच कारण म्हणजे ती एका गरीब घरातून पुढे आलेली आहे. पण, आपण महिला म्हणूनही तिला पाठिंबा देणं गरजेचं आहे.’
तृप्ती देसाई यांचं हे वक्तव्य ऐकून आता गौतमी पाटीलचे चाहते आनंदी झाले आहेत. गौतमी लवकरच एका नव्या कोऱ्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौतमी पाटीलचा 'घुंगरु' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या चित्रपटाचं शूटिंग सोलापूर, मढ, हंपीसह परदेशात झालं आहे. गौतमी पाटील अभिनेता बाबा गायकवाड याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
संबंधित बातम्या