मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rohini Hattangadi Birthday: मनोरंजनाच्या अवकाशातील ‘रोहिणी’ नक्षत्र! वाचा अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी...

Rohini Hattangadi Birthday: मनोरंजनाच्या अवकाशातील ‘रोहिणी’ नक्षत्र! वाचा अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 11, 2023 07:37 AM IST

Happy Birthday Rohini Hattangadi: गांधी’ चित्रपटात कस्तुरबांची भूमिका अजरामर करणाऱ्या रोहिणीताईंची आणि कस्तुरबांची जन्मतारीख एकच! या भूमिकेनेच त्यांना चित्रपट जगतात ओळख मिळवून दिली.

Rohini Hattangadi
Rohini Hattangadi

Happy Birthday Rohini Hattangadi: अनेकांच्या आयुष्यात काही न काही योगायोग असतात. रोहिणीताईंच्या आयुष्यातही असाच एक मोठा योगा योग आहे. ‘गांधी’ चित्रपटात कस्तुरबांची भूमिका अजरामर करणाऱ्या रोहिणीताईंची आणि कस्तुरबांची जन्मतारीख एकच! या भूमिकेनेच त्यांना चित्रपट जगतात ओळख मिळवून दिली. १९८२मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची सगळीकडेच वाहवा झाली.

रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म ११ एप्रिल १९५१ रोजी पुण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अनंत ओक, तर आईचे नाव निर्मला ओक. आई-वडील आणि बंधू रवींद्र ओक तिघेही अभिनयक्षेत्रात कार्यरत होते. अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने रोहिणीताईंना बालपणापासूनच अभिनयात रुची होती. नवी दिल्ली येथील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ अर्थात एनएसडी येथे त्यांनी तीन वर्षांचे अभिनय प्रशिक्षण घेतले. भरतनाट्यम् नृत्य व कथकली नृत्य या अभिजात भारतीय नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण देखील त्यांनी घेतले.

एनएसडीतून शिक्षण घेतलेल्या रोहिणीताईंचे गुरु होते इब्राहीम अल्काझी! रोहिणीताईंच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी रंगभूमीवर झाली. अभिनय प्रशिक्षण कालावधीत त्यांनी विविध भाषांमधील नाट्यप्रयोगांमध्ये निरनिराळ्या भूमिका केल्या. त्यांत विख्यात हिंदी-उर्दू कादंबरीकार प्रेमचंद यांच्या गोदान या कादंबरीवर आधारित होरी या नाटकातील ‘धनिया’, कर्नाटकातील यक्षगान या लोकनाट्यातील भीष्मविजयमधील ‘अंबा’, इबारगी या जपानी काबुकी पद्धतीच्या नाटकातील ‘मावशी’, अंधायुगमधील ‘गांधारी’ इत्यादी त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. ‘एका म्हाताऱ्याचा खून’ या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन केले. प्रशिक्षण काळात त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी असे सन्मानही प्राप्त झाले. जपानी काबुकी नाट्यप्रकारामध्ये, तसेच कर्नाटकातील यक्षगान या लोकनाट्यप्रकारामध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या आशियाई महिला होत्या.

एनएसडीमध्ये असताना त्यांची जयदीप हट्टंगडी यांच्यासोबत ओळख झाली. २८ मे १९७७ रोजी रोहिणी यांनी जयदीप यांच्याशी लग्नगाठ बांधली. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात दोघांनी एका मराठी थिएटर ग्रुपची सुरुवात केली. या ग्रुपने १५०हून अधिक नाटकांची निर्मिती केली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधूनच जयदेव यांनी दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेतले. पुढे प्रख्यात दिग्दर्शक म्हणून ते नावाजले गेले.

रामदास भटकळ यांनी कस्तुरबा गांधी यांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या ‘जगदंबा’ या नाटकाच्या एकपात्री प्रयोगात रोहिणीताईंनी कस्तुरबांची केलेली भूमिका लक्षणीय होती. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘खंडोबाचं लगीन’ या नाटकातील त्यांची मुरळीची भूमिकाही लक्षवेधी ठरली. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी ‘कस्तुरीमृग’, ‘लपंडाव’, ‘लफडासदन’, ‘डंख’, ‘मित्राची गोष्ट’, ‘रथचक्र आदी नाटकांतून महत्त्वाच्या भूमिका केल्या. मराठी-हिंदीच नव्हे तर त्यांनी गुजराती व्यावसायिक नाटकांमधूनही भूमिका वठविल्या. ‘सर्पनाद’, ‘अमे जीविये बेफाम’, ‘माणस होवानो मनेडंख’, ‘तहोमत’ अशी गुजराती नाटके त्यांच्या भूमिकेने गाजली. जयदेव व रोहिणी यांनी प्रयोगशील नाटके सादर करण्यासाठी मुंबई येथे ‘कलाश्रय’ ही संस्था काढली. नितिन सेन यांच्या बंगाली कथेवर आधारित अपराजिता हा जयदेवदिग्दर्शित एकपात्री प्रयोग आणि त्यातील रोहिणी यांची भूमिका अतिशय गाजली. हिंदी व मराठीमध्ये त्याचे अनेक प्रयोग झाले.

१९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’ या चित्रपटाद्वारे रोहिणीताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘चक्र’, ‘अर्थ’, ‘सारांश’, ‘अग्निपथ’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अपत्यवियोगाचे दु:ख भोगणाऱ्या वयस्क जोडप्याची कथा असलेल्या ‘सारांश’ या चित्रपटातील जोडप्यामधल्या पत्नीची संस्मरणीय भूमिका रोहिणीताईंनी केली. कन्नड ‘मनेसूर्या’, मल्याळम् ‘अच्युवेत्तन्ते वीडु’ आणि ‘अग्निदेवता’, तेलुगू ‘सीतारामय्यगारी मनवरालु’, तमिळ ‘वसूल राजा एमबीबीएस’ असे दाक्षिणात्य भाषेतील अनेक चित्रपट त्यांनी केले. छोट्या पडद्यावरील ‘चार दिवस सासूचे’, ‘होणार सून मी या घरची’ या रोहिणीताईंच्या मालिकाप्रचंड गाजल्या.

IPL_Entry_Point

विभाग