Gautami Patil First Movie: आपल्या नृत्य अदांनी अवघ्या महाराष्ट्राला घायाळ करणारी गौतमी पाटील लवकरच एका नव्याकोऱ्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात गौतमी मुख्य भूमिका साकारत असून, या निमित्ताने तिने नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गौतमीने इंदुरीकर महाराजांनी केलेल्या आरोपांवर देखील भाष्य केलं. गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमी प्रत्येक कार्यक्रमाचे ३ लाख रुपये घेते, असे वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केले होते. मात्र, यावर आता स्वतः गौतमीने स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी गौतमी म्हणाली की, ‘इंदुरीकर महाराजांना माझ्याबद्दल चुकीची माहिती मिळाली आहे. मी ३ लाख रुपये मानधन घेते, असे काही नाही. माझ्या मानधनाबद्दल ही केवळ चुकीची माहिती आहे. माझं मानधन फारच कमी आहे. ३ लाख ही रक्कम माझ्यासाठी देखील खूप मोठी आहे.’ त्यामुळे आता स्वतः गौतमीने यावर स्पष्टीकरण दिल्याने ती एका कार्यक्रमासाठी नेमके किती मानधन आकारते? अस प्रश्न तिच्या चाहत्यांना देखील पडला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना गौतमी आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटाबद्दल देखील भरभरून बोलली. लावणी स्टार गौतमी पाटीलचा 'घुंगरु' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या चित्रपटाचं शूटिंग सोलापूर, मढ, हंपीसह परदेशात झालं आहे. गौतमी पाटील अभिनेता बाबा गायकवाड याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटातील अनुभवाबद्दल बोलताना गौतमी म्हणाली की, ‘माझा चित्रपट येतोय, याचा मला खूप आनंद होतोय. या आधी माझा अभिनयाशी काहीही संबंध नव्हता. पण, या चित्रपटातील कलाकारांनी मला खूप सांभाळून घेतलं.’
‘मला सहकलाकारांनी खूप गोष्टी शिकवल्या. या प्रवासात खूप धमाल आली. आता मला अभिनय येतोय की, नाही हे तुम्हाला चित्रपट बघितल्यावर कळेलच. माझा हा चित्रपट एका कलाकाराच्या आयुष्यावर आधारित आहे. कलाकाराचं आयुष्य कसं असतं? कलाकारही प्रेमात पडतो.. त्याचाही संसार असतो.. असं सगळं या चित्रपटात पाहता येणार आहे’, असे गौतमी पाटील म्हणाली.
संबंधित बातम्या