प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर या दोघांनी मिळून ‘शिवराज अष्टक’ मालिकेतील पाच चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. या चित्रपटांमध्ये चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका वठवली होती. पण आता सोशल मीडियावर चिन्मयने व्हिडीओ शेअर करत ट्रोलिंगला कंटाळून यापुढे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचे सांगितले. ते ऐकून जवळपास सर्वांनाच धक्का बसला. आता या सगळ्यावर शिवराज अष्टक मालिकेचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
श्री शिवराज अष्टक मालिकेतील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ आणि ‘सुभेदार’ हे ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आगामी चित्रपटांची सर्वजण वाट पाहात असतात. मात्र, चिन्मयने घेतलेल्या मोठ्या निर्णयानंतर चित्रपटांच्या उर्वरित भागांमध्ये महाराजांची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. आता यावर दिग्पालने प्रतिक्रिया दिली आहे.
वाचा: मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचा चिन्मय मांडलेकर याला पाठिंबा, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल
दिग्पाल लांजेकरने नुकताच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याचे मत मांडले आहे. “चिन्मयशी याविषयावर अद्याप माझी सविस्तर चर्चा झालेली नाही. आमचे मेसेजवर बोलणे झाले आहे. पण, त्याने हा निर्णय घेण्याआधी आमची काहीच चर्चा झाली नव्हती. आज चर्चा होईल असे अपेक्षित करतो आहे. शिवराज अष्टक मालिकेत महाराजांची भूमिका अजूनतरी चिन्मयच करणार आहे. पण, आमची चर्चा झाल्यानंतर अंतिम जे काही ठरेल ते मी तुम्हाला नक्की कळवेन” असे दिग्पाल म्हणाला.
वाचा: अंगावर शहारे आणणारा अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ, 'कल्की 2898 एडी' सिनेमातील अश्वत्थामाचा लूक चर्चेत
पुढे तो म्हणाला, "सध्या मी काहीही बोलू शकत नाही. कारण, अनेक गोष्टींची मला काहीच कल्पना नाहीये. या सगळ्याच गोष्टींवर शिवराज अष्टक अवलंबून आहे. शिवराज अष्टक मालिका केवळ चित्रपटाचा भाग नसून तो लोकांच्या भावनांचा देखील भाग आहे. प्रत्येकाला त्यात सहभागी व्हावे लागेल. चर्चा झाल्याशिवाय सध्या यावर मी काहीही बोलणे किंवा वक्तव्य करणे चुकीचे ठरेल.” आता चिन्मय मांडलेकर काय निर्णय घेणार येत्या काळात स्पष्ट होईल.
वाचा: रंगभूमीवर एक अनोखा प्रयोग! पहिल्या मराठी AI महाबालनाटकामध्ये 'ही' अभिनेत्री करणार काम