Prasad Khandekar Namrata Sambherao Left Kurrr Play: सध्या मराठी नाट्यविश्वात अभिनेत्री विशाखा सुभेदार हिच्या 'कुर्रर्रर्र' या नाटकाची चांगलीच हवा आहे. या नाटकाने कमी कालावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. विशाखा सुभेदार हिच्या एका पोस्टमुळे या नाटकाची सध्या जोरदार चर्चा सुरू होती. या नाटकात काहीतरी बदल होणार आहेत, असे संकेत विशाखाने दिले होते. तेव्हापासूनच नेमकं काय बदलणार, नक्की काय घडणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. अखेर हे गुपित आता उघड झाले आहे. या नाटकातील दोन मोठ्या चेहऱ्यांनी आता एक्झिट घेतली आहे. अभिनेता प्रसाद खांडेकर आणि अभिनेत्री नम्रता संभेराव यांनी 'कुर्रर्रर्र' या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांनी आता या नाटकातून काढता पाय घेतला आहे.
अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेता प्रसाद खांडेकर यांनी 'कुर्रर्रर्र' या नाटकातून एक्झिट घेतल्यानंतर आता विशाखा सुभेदार हिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. आपल्या या पोस्टमध्ये विशाखाने लिहिले की, ‘शो मस्ट गो ऑन.. कलाकारांना उत्तम संधी मिळायलाच हवी..त्यांनी मोठं होणं हा कलेचा वारसा जपण्यासारखं आहे..पण तरीही एखादी कलाकृती तीचं नशीब घेवून येते..बाकी आम्ही सगळे निम्मितमात्र. काही पाखरं भरारी मारायला उडून गेली.. हरकत नाही पण शो मस्ट गो ऑन..’
पुढे विशाखा सुभेदार हिने लिहिले की, ‘काही प्रिय मित्रांना हाक मारली त्यांनी साथ दिली म्हणून प्रयोग सुरुळीत ठेवता येत आहेत. माझ्या हाकेला धावून आलेला माझा मित्रसखा प्रियदर्शन जाधव.. आणि मैत्रसखी मयुरा रानडे! मित्रानो तुमच्या साथीसाठी आभार 🙏🙏🙏 आणि नाटकासाठी.., नाटक सुरु राहायला हवं म्हणून त्याची ही धडपड..हे वखाणण्याजोगी आहे. तर मंडळी हाच बदल आहे..नाटक.. कुर्रर्रर्रर्र...कलाकार.. पॅडी कांबळे, प्रियदर्शन जाधव, मयुरा रानडे, विशाखा सुभेदार. आत्तापर्यंत तुम्ही नाटकावर प्रेम केलात त्याबद्दल तुमचे आभार.. पण ह्यापुढे ही कयम सोबत रहा..नाटक बघायला या आणि बघितलं असेल तरीही वेगळ्या संचाच नाटक बघायला या..खात्री आहे.. नाटक जगवणाऱ्या कलाकारांचं कौतुक करायला नक्की याल.’
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या टीव्ही शोमध्ये विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर हे कलाकार एकत्र झळकले होते. यानंतर त्यांनी 'कुर्रर्रर्र' या नाटकाची सुरुवात केली. विशाखा सुभेदार ही नाटकाची निर्माती आहे. तर, अभिनेता-लेखक प्रसाद खांडेकर याने 'कुर्रर्रर्र' हे नाटक लिहिलं आहे.