Adipurush Prerelease collection: दिग्दर्शक ओम राऊत याचा ‘आदिपुरुष’ हा आगामी चित्रपट येत्या १६ जून रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ‘बाहुबली’ अभिनेता प्रभास, अभिनेत्री क्रिती सेनन, अभिनेता सनी सिंह आणि सैफ अली खान हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह असून, सगळेच या चित्रपटाच्या रिलीजची वाट बघत आहेत. एकीकडे हा चित्रपट तुफान चर्चेत असतानाच, आता दुसरीकडे या चित्रपटाने रिलीज आधीच कोट्यवधींची कमाई केल्याचे बोलले जात आहे.
‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज व्हायला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच तब्बल ४२० कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाचे थिएटर हक्क २ राज्यांमध्ये तब्बल १७० कोटी रुपयांना विकले गेल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही, तर याशिवाय या चित्रपटाची ओटीटी डीलही पूर्ण झाली असून, सर्व भाषांचे हक्क नेटफ्लिक्सने २५० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. म्हणजेच आता या चित्रपटाने रिलीजपूर्वीच ४२० कोटींची कमाई केली आहे. मात्र, याची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केवळ काही मिडिया रिपोर्ट्समध्ये या आकड्याची नोंद झाली आहे.
एकीकडे ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून प्रचंड खळबळ माजली आहे. तर, दुसरीकडे या चित्रपटावरून अनेक वादही पाहायला मिळत आहेत. ‘आदिपुरुष’मध्ये ‘रावण’ साकारत असलेल्या सैफ अली खानच्या लूकवरून बराच गदारोळ झाला होता. तर, त्याचवेळी ‘सीता’ साकारणारी अभिनेत्री क्रिती सेनन आणि ‘प्रभु राम’ साकारणाऱ्या प्रभास यांच्या गेटअपवरही काही आक्षेप घेण्यात आले होते. इतकंच नाही, तर चित्रपटाच्या व्हीएफएक्सवरूनही ट्रोलिंग झाली होती. मात्र, नंतर चित्रपटाचे व्हीएफएक्स आणि लूक पुन्हा नव्याने तयार करण्यात आले. त्यानंतर मात्र रावणाचा लूक अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलेला आहे. या चित्रपटातील काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, ती सुपरहिट ठरली आहेत.
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा सुपरस्टार प्रभासचा पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. हा बहुचर्चित चित्रपट हिंदी, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषांमध्ये एकाच वेळी रिलीज होणार आहे. टी-सीरीज, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि यूव्ही क्रिएशन्सचे रेट्रोफाइल्स, वामसीचे प्रमोद आणि राजेश नायर निर्मित 'आदिपुरुष' १६ जून रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.