मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Maharashtracha Favourite Kon: ‘चंद्रमुखी’ अमृता खानविलकर ठरली ‘महाराष्ट्राची फेव्हरेट’; ट्रॉफी पाहून म्हणाली...

Maharashtracha Favourite Kon: ‘चंद्रमुखी’ अमृता खानविलकर ठरली ‘महाराष्ट्राची फेव्हरेट’; ट्रॉफी पाहून म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 13, 2023 11:42 AM IST

Maharashtracha Favourite Kon: अमृता खानविलकरने ‘चंद्रमुखी’ या चित्रपटासाठी फेव्हरेट अभिनेत्रीचा किताब पटकावला आहे. यानिमित्ताने नुकत्याच तिने आपल्या भावना व्यक्त केल्या…

Amruta Khanvilkar
Amruta Khanvilkar

Maharashtracha Favourite Kon: मनोरंजन विश्वातील बहुचर्चित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’. नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला असून, विजेत्यांची नावं लवकरच प्रेक्षकांना कळणार आहेत. मात्र, यातील एक नाव नुकतेच समोर आले आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने ‘महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री’ हा पुरस्कार पटकावला आहे. अमृता खानविलकरने ‘चंद्रमुखी’ या चित्रपटासाठी फेव्हरेट अभिनेत्रीचा किताब पटकावला आहे. यानिमित्ताने नुकत्याच तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी अमृता खानविलकर म्हणाली की, ‘प्रेक्षकांच्या मनात ज्यांनी घर केलं आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. मला आनंद आहे की, माझ्यासाठी खास असलेल्या भूमिकेसाठी हा पुरस्कार मला मिळाला. मायबाप प्रेक्षकांना आपली भूमिका आवडावी असं मला नेहमी वाटतं, आणि हा पुरस्कार म्हणजे त्याचीच पावती आहे. प्रेक्षक वेळात वेळ काढून प्रेक्षक आपल्यासाठी मत देतात ही भावनाच खूप सुखावणारी आहे. खरंतर, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटावर खूप काम झालं होतं. कादंबरीतील चंद्रा साकारण्यासाठी मीदेखील खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी छान प्रतिसाद दिला होता. गाणी गाजली. सोशल मीडियावरदेखील चंद्रा ट्रेंडमध्ये होती. या सिनेमासाठी मला पुरस्कार मिळावा अशी आशा वाटत होती.’

‘या पुरस्काराने माझ्या मेहनतीवर यशाचा मुकूट चढवला आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे भविष्यात अधिक सशक्त भूमिका निवडण्याची जबाबदारीही वाढली आहे. लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीमुळे चंद्रा ही महाराष्ट्राच्या वाचकांच्या मनात रूजली होतीच, पण पडदयावरची चंद्रा साकारून मी प्रेक्षकांनाही प्रभावित करू शकले हा आनंद मला माझ्या चाहत्यांनी दिला आहे. जेव्हा पुरस्कारासाठी माझं नाव पुकारण्यात आलं तेव्हा माझ्या जवळचे सगळे लोक सोबत होते. त्यांच्यासोबत हा आनंद साजरा करताना खूप छान वाटलं. ही बातमी कळताच नवरा हिंमाशूचा पुढच्याच क्षणी फोन आला. अनेक चाहते, मित्रमंडळी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. मराठी सिनेमाची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी दिलेल्या सर्वाधिक मतांनी मला या पुरस्कारापर्यंत पोहोचवलं आहे. चंद्रा तर माझ्यासाठी खास आहेच पण हा पुरस्कारही स्पेशल आहे.’

२६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ हा सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे . प्रेक्षकांच्या पसंतीतूनच महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? या पुरस्कारावर नाव कोरलेल्या कलाकारांना या सोहळ्यात गौरवण्यात येणार असल्याने प्रेक्षकांनाही या कार्यक्रमाची प्रचंड उत्सुकता आहे .

IPL_Entry_Point

विभाग