मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Maharashtra Shahir: बाळासाहेब ठाकरे ते साने गुरुजी; ‘महाराष्ट्र शाहीर’च्या टीझरमध्ये दिसली दिग्गज नेत्यांची झलक!

Maharashtra Shahir: बाळासाहेब ठाकरे ते साने गुरुजी; ‘महाराष्ट्र शाहीर’च्या टीझरमध्ये दिसली दिग्गज नेत्यांची झलक!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 20, 2023 06:20 PM IST

Maharashtra Shahir Teaser Out: ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी असे दिग्गज पडद्यावर अवतरताना दिसणार आहेत.

Maharashtra Shahir
Maharashtra Shahir

Maharashtra Shahir Teaser Out: 'जय जय महाराष्ट्र माझा...’ हे अजरामर महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ या बहुचर्चित चित्रपटाची पहिली झलक अर्थात टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख श्री राज ठाकरे यांच्या हस्ते टीझरचे प्रकाशन करण्यात आले. शाहिरांची ही जीवनगाथा म्हणजे रसिकांसाठी गाण्यांच्या रूपातील एक पर्वणी असणार असल्याची खात्री हा टीझर पटवून देतो.

ट्रेंडिंग न्यूज

‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी असे दिग्गज पडद्यावर अवतरतात. त्यांची प्रहसने पार्श्वभूमीवर येतात. ‘कृष्णराव गणपतराव साबळे! हा असा आवाज कधीच ऐकला नव्हता, पंचामृतासारखा!’,’तुमचा पिंड कलावंताचा. तुम्ही एकाचवेळी अनेकांना जागवू शकता.’ ‘आमची भिस्त तुमच्यावर आहे, कारण जनतेची नाडी तुम्हाला कळली आहे’, अशी गौरवगाथा या दिग्गजांच्या तोंडी येते आणि त्यानंतर साने गुरुजींची थाप पाठीवर पडते, ‘तू नुसता गात नाहीस कृष्णा, शाहीर आहेस शाहीर!’ येळकोट येळकोट जय मल्हार, जेजुरीच्या खंडेराया जागराला या या, आगंगंगं इंचू चावला... अशी विविध प्रकारातील शाहिरांनी गायलेली गाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय-अतुल या संगीतकार जोडीने शाहिरांच्या संगीत कारकिर्दीला पूर्ण न्याय दिला आहे. त्यांची ही विविधांगी गाणी पडद्यावर रसिकांसाठी एक आगळी पर्वणीच ठरणार आहे.

टीझरमध्ये एका दृष्यात्त शाहीर जाहीर करतात, ‘गुरुजी मी गाणं कायमचं सोडलं...’ त्यावर गुरुजी समजावतात, ‘गाणं हा तुझा श्वास आहे, तुझ्या आत्म्याला गरज आहे त्याची.’ आणि मग पडद्यावर साकारतं ते अजरामर गीत... ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...!’

शाहीर साबळे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान होते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र आणि राज्याभिमान जागविण्याचे काम केले. या कार्याच्या माध्यामतून ते अनेक जाज्ज्वल्य प्रतिभा असलेल्या मान्यवरांच्या सानिध्यात आले. साने गुरुजी, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे, सेनापती बापट ही त्यांपैकीच काही नावे. शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने यातील काही व्यक्तिमत्त्वे रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत.

‘महाराष्ट्र शाहीर’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे! या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. शाहिरांच्या प्रमुख भूमिकेत अंकुश चौधरी आहे.

IPL_Entry_Point

विभाग