मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Maharashtra Shahir: 'महाराष्ट्र शाहीर'कडे पाठ; सत्ताधारी नेत्यांकडून 'द केरळ स्टोरी'चे कौतुक; दिग्दर्शक भडकला

Maharashtra Shahir: 'महाराष्ट्र शाहीर'कडे पाठ; सत्ताधारी नेत्यांकडून 'द केरळ स्टोरी'चे कौतुक; दिग्दर्शक भडकला

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 08, 2023 12:18 PM IST

Maharashtra Shahir: सध्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटांचीच गळचेपी होताना दिसत आहे. याचाच फटका आता ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाला देखील बसला आहे. निर्माते-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

Maharashtra Shahir fame director Kedar Shinde
Maharashtra Shahir fame director Kedar Shinde

Maharashtra Shahir: शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी याच्यासह अनेक दिग्गज मराठी कलाकार झळकले आहेत. मात्र, सध्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटांचीच गळचेपी होताना दिसत आहे. याचाच फटका आता ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाला देखील बसला आहे. या चित्रपटाला देखील काही ठिकाणी कमी स्क्रीन मिळाल्या आहे. मात्र, नुकताच रिलीज झालेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तर, काही ठिकाणी याचे विशेष शो आयोजित केले जात आहेत. यावर निर्माते-दिग्दर्शक केदार शिंदे संतापले आहेत.

‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘दुर्दैव... महाराष्ट्रात "केरला स्टोरी" या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने "महाराष्ट्र शाहीर" प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?’ त्यांचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट नुकताच देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी या चित्रपटाला अतिरिक्त शो मिळाले आहेत. तर, काही ठिकाणी नेतेमंडळी खास शोचे आयोजन करून लोकांना फुकटात हा चित्रपट दाखवत आहेत. यावर आता केदार शिंदे भडकले आहेत. महाराष्ट्रात नेते मंडळी मराठी चित्रपटांना प्रोत्साहन न देता हिंदी चित्रपटांसाठी डावलण्याच काम करत आहेत, हे चूक असल्याच्या आशयाचे ट्वीट करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्र दिनी’ प्रदर्शित झालेला ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट आणि त्या चित्रपटात दाखवलेले शाहीर साबळे कोण? हे या नेते मंडळींना माहित असेल का? असा संतप्त सवाल देखील त्यांनी केला आहे.

मात्र, त्यांच्या या ट्वीटवर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युझरने लिहिले की, ‘तुलनाच चुकली..!! दोन्ही विषयांचे गांभीर्य इतकं वेगळं आहे की, त्यात याचं प्रमोशन का त्याचं प्रमोशन असा विषयही डोक्यात येत नाही..!! केरला स्टोरीमध्ये दाखवला गेलेला इश्यू हा नॅशनलच नाही तर आंतरराष्ट्रीय आहे.’ तर आणखी एकाने लिहिले की, ‘जाऊ द्या, जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. "केरला स्टोरी" फुकट दाखवून राजकीय पोळी भाजली जाईल, यासाठी तो खटाटोप असावा. आपले नाणे खणखणीत आहे, अस्सल आहे, सत्य आहे. आपल्याला राजकीय फुकट शोची आवश्यकता नाही. आपले प्रयत्न व कलाकृती मराठी रयतेच्या हृदयात नक्कीच स्थान मिळवेल हा विश्वास आहे.’

IPL_Entry_Point

विभाग