Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज (शुक्रवारी, २६ एप्रिल २०२४) महाराष्ट्रातील ८ मतदारसंघात मतदान सुरु आहे. या टप्प्यात अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान, वर्ध्यातील एका मतदाराची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या मतदाराने माकडाला कडेवर घेऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. यामुळे मतदान केंद्रात एक वेगळच वातावरण पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, माकडाला घेऊन मतदान करण्यासाठी आलेल्या मतदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ देवळीतील मतदान केंद्र क्रमांक १८९ येथील आहे. विनोद क्षीरसागर असे माकडाला घेऊन मतदान केंद्रात पोहोचलेल्या मतदाराचे नाव आहे. विनोद क्षीरसागर हे वर्ध्यातील देवळी येथील रहिवाशी आहे. एका वृत्तवाहिनीतील पत्रकाराने विनोद क्षीरसागर यांच्याची संवाद साधला असता ते म्हणाले की, त्यांच्यासोबत मतदान केंद्रात आलेले माकड त्यांच्याशिवाय राहत नाही. विनोद यांनी हे माकड पाळले असून ते तीन महिन्याचे आहे. यामुळे त्यांना माकडाला सोबत नेऊनच मतदान करावे लागले, अशी माहिती समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत अंदाजे १८.८३ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. त्यानुसार, वर्धा (१८.३५ टक्के मतदान), अकोला (१७.३७ टक्के मतदान), अमरावती (१७.७३ टक्के मतदान), बुलढाणा (१७.९२ टक्के मतदान), हिंगोली (१८.१९ टक्के मतदान), नांदेड (२०.८५ टक्के मतदान), परभणी (२१.७७ टक्के मतदान) आणि यवतमाळ- वाशिम येथे सकाळी ११ वाजेपर्यंत १८.०१ टक्के मतदान झाले.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात एकूण ५६.५४ टक्के मतदान झाले. रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदान गडचिरोली- चिमूर मतदारसंघात (५५.७९ टक्के मतदान) झाले. तर, भंडारा- गोंदिया (४५.८८ टक्के मतदान), चंद्रपूर (४३.४८ टक्के मतदान), रामटेक (४०.१० टक्के मतदान) आणि नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये ३८.४३ टक्के मतदान झाले.