मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Loksabha Election 2024 : राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड! निवडणूक अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार ताटकळले

Loksabha Election 2024 : राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड! निवडणूक अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार ताटकळले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 26, 2024 12:24 PM IST

EVM Machine issue in Maharashtra: राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. ८ मतदार संघात हे मतदान होत असून अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पाडल्याच्या घटना घडल्या. यामुळे काही ठिकाणी मतदान रखडले होते.

राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड! निवडणूक अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार ताटकळले
राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड! निवडणूक अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार ताटकळले (Hindustan Times)

EVM Machine issue in Maharashtra: राज्यात आज दुसऱ्या टप्यातील मतदान होत आहे. वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, परभणी, नांदेड, हिंगोली येथे मतदान पार पडत आहे. मात्र, सकाळ पासून येथील काही मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना घडल्या. या मुळे मतदान ठप्प झाले होते. काही ठिकाणी सकाळी ७ वाजता मतदान यंत्र बंद पडल्याने मतदान रखडले होते. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर काही वेळ मतदारांना प्रतीक्षा करावी लागली. ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.

SC on VVPAT : ईव्हीएमनेच होणार मतदान; मतदान केल्याची प्रत्येक स्लीप तपासण्याची मागणी फेटाळली! सुप्रीम कोर्टाचा निर्णय

वर्धा, अमरावती, अकोला, हिंगोली येथे ईव्हीएम बंद पाडल्याच्या घटना घडल्या. अमरावतीत रुक्मिणीनगर शाळा क्रमांक १९ मधील खोली क्रमांक ५ मध्ये ईव्हीएम बंद पडले. तब्बल १५ मिनिटे येथील वोटिंग मशीन बंद पडले. यमुळे येथील मतदान रखडले. काही वेळाने मशीन मधील बिघाड दुरुस्त झाला. यानंतर येथील मतदान सुरळीत सुरू झाले. वडरपुरा भागातील महापालिका शाळेतील मतदान केंद्रात ईव्हीएममध्ये बिघाड झाला. या केंद्रात तीन खोल्या आहेत. त्यापैकी खोली क्रमांत १ मधील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान थांबले होते.

संभाजीनगर हादरले! बाळ होत नाही म्हणून अघोरी प्रकार, तृतीयपंथीयाचा आत्मा असल्याचं सांगत महिलेच्या अंगावर टोचले खिळे

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही देखील काही केंद्रांवर ईव्हीएम यंत्रात बिघाड झाला. उमरा येथील बुथ क्रमांक ३३३ वर मतदान यंत्र बंद पडले. येथील मतदान ७.३० वाजेपर्यंत खोळंबले होते. ईव्हीएम बदलण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातटाकळी येथेही मतदान यंत्र बंद पडले. तब्बल १ तास हे ईव्हीएम बंद होते. यामुळे तासभर मतदार रांगेतच उभे होते. यामुळे केंद्राबाहेर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या. एक तासानंतर येथील ईव्हीएममधील बिघाड दुरुस्त करण्यात आला. यानंतर मतदान सुरळीत पार पडले.

Lok sabha Election 2 phase voting live : राज्यात ८ मतदारसंघात ९ वाजे पर्यंत ८ टक्के मतदानाची नोंद

वर्धा जिल्ह्यातील टाकली येथील तर देवळी येथील यशवंत कन्या माध्यमिक शाळेच्या १८५ क्रमांकाच्या केंद्रावर सकाळी मतदान यंत्रे बंद पडले. याचा फटका खासदार रामदास तडस यांना बसला. ईव्हीएम मशीन बंद पडल्याने ते ४० मिनिटे रांगेत उभे होते.

हिंगोलीत ३९ मतदान केंद्रावर पहिल्या २ तासात मतदान प्रक्रिया खोळंबली होती. हिंगोलीत ३९ बॅलेट मशीन आणि १६ कंट्रोल युनिट बदलले. तर २५ ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या मशीन बदलाव्या लागल्या. एकूण ३९ हून अधिक मतदान केंद्रावर पहिल्या दोन तासांत मतदानात अडथळा आला. सकाळच्या टप्प्यात तापमान कमी असल्याने मतदारांनी सकाळी गर्दी केली होती. मतदान रखडल्यामुळे मतदार ताटकळले होते. यामुळे मतदानाचा टक्का घसरला.

नांदेडच्या मतदान केंद्र ५ वरील ईव्हीएम मशीन बंद

नांदेडच्या मतदान केंद्र ५ वरील ईव्हीएम मशीन बंद झाले होते. तासाभरापासून मतदान केंद्र बंद होते. याचा फटका मतदारांना बसला.

राज्यातील ८ लोकसभा जागांसाठी आज मतदान

महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्पात विदर्भातील ५ जागांवर मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ८ टक्के मतदानाची नोंद झाली.

WhatsApp channel