भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर येत्या दोन दिवसात दुसरी यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जागांचा समावेश आहे. महायुतीतील घटक पक्षांसोबत जागावाटपाची चर्चा सुरू असताना भाजपकडून काही उमेदवारांची नावे निश्चित झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात कागलच्या राजघराण्यातील समरजीत घाडगे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र भाजपच्या वतीने केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत २५ जागांचे सादरीकरण केलं गेलं. या बैठकाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे आदि महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासमोर महाराष्ट्रातील नेत्यांनी जागांचे सादरीकरण केलं.
या बैठकीत महाराष्ट्रातील २५ जागांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी यादी सादर केली. बैठकीत चर्चा झालेल्या काही नावांची उद्या (मंगळवार) घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
नागपूर- नितीन गडकरी
जालना- रावसाहेब दानवे
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
पुणे- मुरलीधर मोहोळ
सांगली- संजय काका पाटील
भिवंडी- कपिल पाटील
दिंडोरी- भारती पवार
बीड- पंकजा मुंडे
तसेच कोल्हापूरमधून जर जागा भाजपच्या वाट्याला आली नसल्यास समरजीत घाटगे यांना शिवसेनेच्या चिन्हावर मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे.