मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  CAA News : मोदी सरकारचा मोठा निर्णय; आजपासून देशभरात सीएए लागू, काय आहे हा कायदा?

CAA News : मोदी सरकारचा मोठा निर्णय; आजपासून देशभरात सीएए लागू, काय आहे हा कायदा?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 11, 2024 06:51 PM IST

Citizenship Amendment Act CAA :केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे.

आजपासून देशभरात CCA लागू
आजपासून देशभरात CCA लागू

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. गृहमंत्रालयाकडून CAAची (Citizenship Amendment Act) अधिसूचना सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आली आहे. आजपासून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA लागू करण्यात आला आहे.

मोदी सरकारने डिसेंबर २०१९ मध्ये संबंधित विधेयकाला मंजुरी दिली होती आणि नंतर राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर त्याविरोधात देशाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली.  CAA  बाबत देशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दिल्लीत अनेक महिने याविरोधात आंदोलन सुरू होते. अनेक राजकीय पक्षांनीही याला विरोध केला. यामुळे, सरकारने नियम तयार करण्यास उशीर केला होता, परंतु आता CAA नियमांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या अनेक भाषणांमध्ये अनेकदा नागरिकत्व सुधारणा कायदा किंवा CAA लागू करण्याबाबत भाष्य केलं होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले होते. अशा परिस्थितीत गृहमंत्रालयाने त्याच्या अंमलबजावणीची तयारी पूर्ण केली असून आता त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. 

काय आहे सीएए?

सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा असे सीएए कायद्याचे नाव आहे. या कायद्यानुसार, हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ईसाई धर्मांचे जे सदस्य ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आले आहेत, आणि ज्यांना त्या देशांमध्ये धार्मिक अन्याय सहन करावा लागला आहे, अशा नागरिकांना बेकायदेशीर प्रवासी न मानता या कायद्यानुसार आता अशा नागरिकांना भारताची नागरिकता देण्यात येणार आहे. सीएए नियमांनुसार, नागरिकत्व देण्याचा अधिकार पूर्णपणे केंद्राकडे असेल. 

सीएए नियम अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशातून भारतात अल्पसंख्याकांचे भारतीय नागरिकत्व अर्ज सुनिश्चित करतील. यासाठी सरकारने काही काळापूर्वी एक पोर्टलही तयार केले आहे. शेजारील देशांमधून येणाऱ्या पात्र स्थलांतरितांना पोर्टलवर फक्त ऑनलाइन अर्ज करावा लागेल आणि गृह मंत्रालय त्याची पडताळणी करेल आणि नागरिकत्व जारी करेल. यासाठी बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून विस्थापित अल्पसंख्याकांना कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही.

श्रीलंकेतील तामिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या कायद्याचा लाभ मिळणार नाही. घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी भागांना, तसेच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, १८७३ मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना ही दुरुस्ती लागू नाही.

 

IPL_Entry_Point