Wipro Share buyback : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोनं १२ हजार कोटींच्या बायबॅक प्लानची घोषणा केली आहे. दोन वर्षांत दुसऱ्यांदा विप्रो बायबॅक करत असून नव्या योजनेअंतर्गत प्रति शेअर ४४५ हे मूल्य निश्चित करण्यात आलं आहे. कंपनीच्या या घोषणेचे पडसाद शेअर बाजारात उमटले असून कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. शेअर पडल्यामुळं गेल्या अनेक महिन्यांपासून होल्ड करून ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना यामुळं कमाईची संधी चालून आली आहे.
विप्रोच्या संचालक मंडळानं बायबॅक प्लानचा प्रस्ताव मान्य केला असला तरी रेकॉर्ड डेट, टाइमलाइन व अन्य तपशील कालांतरानं जाहीर केला जाणार आहे. यापूर्वी २९ डिसेंबर २०२० ते ११ जानेवारी २०२१ दरम्यान विप्रोनं ९,५०० कोटींच्या बायबॅकची योजना जाहीर केली होती. या अंतर्गत विप्रोनं निश्चित योजनेच्या ९६ टक्के शेअर्स म्हणजे २२,८९,०४,७८५ शेअर बाजारातून पुन्हा विकत घेतले होते. तर, १४ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०१९ दरम्यान १०,५०० कोटींच्या बायबॅकची योजना राबवली होती.
‘बायबॅक’ हा खुल्या बाजारात उपलब्ध शेअर्सची संख्या कमी करण्याचा एक मार्ग आहे. अनेक कारणांसाठी कंपन्या असा निर्णय घेत असतात. शेअर्सचे केंद्रीकरण टाळणं हे त्यातील एक महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. अनेक कंपन्यांनी आतापर्यंत बायबॅक केलं आहे. त्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिसचाही समावेश आहे.
संबंधित बातम्या