मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : थेंबे थेंबे तळे साचे... उद्योगउभारणी आणि बचतीचे महत्व

Business Ideas : थेंबे थेंबे तळे साचे... उद्योगउभारणी आणि बचतीचे महत्व

HT Marathi Desk HT Marathi
Apr 26, 2024 05:40 PM IST

Business Ideas - ‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण आपण लहानपणी वाचलेली असली तरी तिचे खरे महत्त्व मोठेपणी उमगते. काटेकोर बचतीतून साठलेल्या गंगाजळीच्या जोरावरच गेली ४० वर्षे मी व्यवसायाचा विस्तार साधत आलो आहे.

Business ideas- Importance of saving money in Business
Business ideas- Importance of saving money in Business

 

धनंजय दातार

माझ्या बाबांची दुबईतील पहिली नोकरी संपुष्टात येताच त्यांनी दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न सुरु केले आणि त्यांना ती मिळालीही, पण तो आनंद जेमतेम महिनाभर टिकला. बाबा रुजू होणार होते त्या कंपनीने त्यांना व्हिसाच दिला नाही. त्यामुळे जुनी नोकरी संपली आणि नवी नोकरी अधांतरी लटकलेली, अशा विचित्र स्थितीत ते तब्बल सहा महिने मुंबईत बेरोजगार म्हणून घरी बसून राहिले. शिलकी रक्कम घरखर्चासाठी भरभर संपू लागली. एक वेळ अशी आली, की हातात पैसा नाही आणि घरात धान्य नाही, अशी आमची लाजीरवाणी अवस्था झाली. पण माझी आई हिंमतवान होती. तिचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजा भवानीवर विश्वास ठेऊन ती प्रत्येक आव्हानाला सामोरे जाई.

रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ झाली तसे आईने देवघरातून काही पुरचुंड्या बाहेर काढल्या. आईला ओटीमध्ये जे तांदूळ मिळत ते ती छोट्या पुरचुंड्यात साठवून देवघरात ठेवत असे. काही पैसेही होते त्या पुरचुंड्यांमध्ये. ते तिने बाबांच्या हवाली केले आणि डाळ-तांदुळाची खिचडी रांधून वेळ निभावली. आजचा दिवस संकटाचा असला तरी उद्याचा दिवस चांगला असेल या विश्वासावरच आई असे प्रसंग निभावून नेई. खरोखर पुढचा दिवस आशादायक ठरला. बाबांचा रखडलेला व्हिसा मंजूर झाल्याने त्यांचा चेहरा आनंदाने उजळला. नेहमीप्रमाणे त्यांनी आईच्या गळ्यातील सोन्याची साखळी गहाण टाकली, घरात दोन महिन्यांचा शिधा भरला आणि विमानाचे तिकीट काढून ते दुबईला रवाना झाले. आईच्या बचतीच्या सवयीने आम्ही उपाशी राहण्यापासून वाचलो हा प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला.

बचतीची खरी ताकद मला दुबईत गेल्यानंतर समजली. दुबईत सुरवातीला आमचे एकच दुकान होते. ते चांगले चालू लागल्यावर मी बँकेचे कर्ज घेऊन दुसरे दुकान सुरु केले. तेही चांगले चालू लागले, पण त्या कर्जाचे दडपण माझ्यावर येऊ लागल्याने सहा महिन्यांतच मी जवळच्या पैशातून कर्जफेड करुन टाकली. त्या काळात मी आमच्या दुकानाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये चहा प्यायला जात असे. त्या हॉटेल मालकाची एक सवय होती. तो रोज १०० दिऱ्हॅमच्या दोन नोटा काऊंटरखालच्या दोन छोट्या डब्यांमध्ये साठवत असे. एकदा मी कुतूहलाने कारण विचारले. त्यावर तो म्हणाला, “अरे याचा खूप फायदा होतो. माझे महिन्याला सहा हजार दिऱ्हॅम साठतात. त्यातील निम्म्या पैशातून मी हॉटेलचा खर्च, मालखरेदी व नोकरांचा पगार भागवतो, तर उरलेले निम्मे पैसे हे माझी बचत असल्याने ते गुंतवणुकीसाठी राखून ठेवतो. त्यामुळे ऐनवेळी पैसा कुठून उभारायचा याची काळजी मला उरत नाही आणि कुणाकडे हातही पसरावे लागत नाहीत.”

मीसुद्धा या कल्पनेने प्रभावित होऊन उत्साहाने माझ्या दोन दुकानांमागे पाचशे दिऱ्हॅमच्या दोन नोटा छोट्या डब्यांमध्ये साठवायला सुरवात केली. काहीही झाले तरी त्यांना वर्षभर हात लावायचा नाही, असा निश्चय केला आणि तो तडीस नेला. वर्षभराने बघितले तर त्यात भारतीय चलनाच्या हिशेबात चक्क २५ ते ३० लाख रुपये जमा झाले होते. ही बऱ्यापैकी मोठी रक्कम होती. त्यातून मी अबूधाबीला तिसरे दुकान सुरु केले. तेही उत्तम चालू लागल्याने हाच बचतीचा प्रयोग मी पुढे सुरु ठेवला आणि दोन वर्षांनी शारजाला चौथे दुकान थाटले. साठवलेल्या पैशांच्या जोरावर मी अगदी दरवर्षी एक नवे दुकान सुरु करत गेलो. आश्चर्य वाटेल, पण याच बचतीतून मी अत्याधुनिक तंत्रज्ञानसज्ज अशा दोन पीठगिरण्या आणि मसाल्याचे कारखानेही उभारले. त्यासाठी कर्ज काढण्याची वेळ आली नाही.

जवळ पैसा असेल तेव्हा माणूस बेफिकीरीने उधळपट्टी करतो, पण पैशाची खरी किंमत अडचणीच्या वेळी कळते. म्हणून सुरवातीपासून नियमित साठवणुकीची सवय लावून घेणे उत्तम. समर्थ रामदासांनी दासबोधात दिलेला इशारा समर्पक आहे.

मिळविती तितुके भक्षिती। ते कठीण समयी मरुन जाती। दीर्घ विचारे वर्तती। तेचि भले॥

मित्रांनो! बचत ही नेहमी पैशाचीच असते असे नाही. आपण वेळेची, श्रमाची, पदार्थांची आणि शब्दांचीही बचत करु शकतो. बचतीचा फॉर्म्युला नेहमीच फायदेशीर ठरतो. बचतीचा मार्ग एका सुभाषितात नेमकेपणाने सांगितला आहे.

जलबिंदु निपातेन क्रमशः पूर्यते घटः।

स हेतुः सर्वविद्यानां धर्मस्यच धनस्यच॥

( पाण्याच्या थेंबाथेंबाने जशी घागर हळूहळू भरत जाते त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या विद्या, धर्म आणि धन यांचा संचयही असाच क्रमाक्रमाने होतो.)

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)

WhatsApp channel

संबंधित बातम्या